राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने का दिला राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन शिंदे

ADVERTISEMENT

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्याची वरदायनी असणाऱ्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याच्या निर्णयानंतर सोलापूर-बारामती संघर्ष पेटला होता. पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेपासून ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या दारात हलगी नाद आंदोलनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे (Shiv sena) सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उजनी पाण्यावरून जिल्ह्यातील वातावरण गढूळ होत असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय मागे घेतल्यानंतर देखील उजनीचे तापलेले पाणी थंड होण्याचे नाव घेताना दिसत नाही.

उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांचा लेखी आदेश आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली असताना आता महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार (NCP MLA) बबनराव शिंदे यांनी उजनीचे पाणी इंदापूरला न देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा लेखी आदेश काढला नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा (Resignation) देऊ अशी भूमिका घेतली आहे.

हे वाचलं का?

विरोधकांनी आदेशाचे राजकारण करू नये. पक्षाध्यक्षांवर आमचा विश्वास आहे. उजनीच्या पाणी वाटपात पाणी शिल्लक नाही. इंदापूरला जे पाणी न्यायचं आहे ते खडकवासलचवरून न्यावं आमची काय हरकत नाही. मात्र ऑक्टोबर ते जूनपर्यंत पुण्याहून उजनीमध्ये एक थेंबही पाणी येत नाही. अश्यात उजनीतून 5 टीएमसी पाणी उचलणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारे आहे. हा रद्द केलेला आदेश लवकरच लेखी स्वरुपात मिळेल आणि हे नाही झालं तर आमदारकीचा राजीनामा देईल. अशी भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी घेतली आहे.

उजनीच्या पाण्यावरुन संघर्ष कायम, इंदापुरात आंदोलनाला सुरुवात

ADVERTISEMENT

त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार हा आदेश तात्काळ रद्द करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्याने बैठकीच्या दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करीत इंदापूर बारामती राज्य महामार्ग रोखून धरल्याच्या घटना घडल्या. दरम्यान इंदापूर तालुक्याचे पाच टीएमसी पाणी परत मिळण्यासाठी वेळप्रसंगी रक्त सांडू असा  इशारा कृती समितीने दिल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. (why ncp mla babanrao shinde warned to resign what exactly is the matter?)

ADVERTISEMENT

उजनीच्या पाण्यावरून महाविकास आघाडीच्या आमदाराने दिला होता शरद पवारांना घरचा आहेर

उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावावर इंदापूर तालुक्यात वळवण्याच्या निर्णयावरून सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवारांनी सत्ता आली की फक्त बारामतीचा विकास केला. असं म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी पवारांना घरचा आहेर दिला होता. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र विरोध केलेला आहे. अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार राहावे. असा इशारा त्यांनी दिला होता.

…म्हणून सरकार हा आदेश रद्द करेल- आमदार प्रशांत परिचारक

‘बबनदादा शिंदे हे जिल्ह्यातील जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख, सुधाकरपंत परिचारक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर नव्या पिढीत ते जेष्ठ आहेत. त्यांनी पोटतिडकीने भूमिका मांडली आहे. त्यामुळे अजितदादांनी हा राजीनामा देऊ नये म्हणून सरकार हा आदेश रद्द करेल.’ असा विश्वास भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट सरकारवर निशाणा साधला. ‘उजनी पाण्याच्या निर्णयावरून सरकार तोंडावर पडले असून सरकारला वारंवार तोंडावर पडायची सवय झाली आहे.’

उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर घणाघाती टीका

उजनीचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नेमकं प्रकरण काय आहे?

उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता.

इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. तो निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींसाठी ठरलेल्या पाण्यातील एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेला असेल तर मी राजकारण सोडून देईन. असे वारंवार पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

मात्र, सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी देण्याचा तो निर्णय होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्या वेळी सर्वांनी हा आदेश रद्द करण्याचीच मागणी लावून धरली.त्यासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती. जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणी प्रश्‍नावरून ढवळल्यानंतर उशिरा का होईना, जलसपंदा मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला.

राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या आदेशाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत जोपर्यंत उजनीच्या पाण्याचा इंदापूरला न देण्याबाबतचा लेखी आदेश येत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा व इंदापूर तालुक्यातील वातावरण हे असंच धुमसत राहण्याचे चित्र दिसत आहे. त्यातच या आदेशावरून आमदार बबनराव शिंदे यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT