प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रेम संबंधांमध्ये अडथळा येत असलेल्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महत्वाची बाब म्हणजे पतीचा खून केल्यानंतर पत्नीने कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. परंतू पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी तपास केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

मनोहर हांडे (वय २२) असं मयत व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी हत्येत सहभागी असलेली पत्नी आश्विनी हांडे आणि तिचा प्रियकर गौरव सुतारला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आश्विनी आणि मनोहर यांचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नाआधी आश्विनी आणि गौरव यांचे प्रेमसंबंध होते. दोघांना लग्नही करायचं होतं परंतू घरच्यांचा विरोध असल्यामुळे हे लग्न झालं नाही. त्यातच आश्विनीच्या घरच्यांनी तिचं लग्न मनोहरशी लावून दिलं.

परंतू लग्नानंतरही आश्विनी आणि गौरवची भेट सुरुच होती. शेवटी दोघांनीही मनोहरचा काटा काढायचं ठरवलं. एक दिवशी आश्विनीने आपला पती मनोहरला दुधामधून झोपेच्या गोळ्या टाकून दिल्या. मनोहरने हे दूध प्यायल्यानंतर त्याला गाढ झोप लागली. गाढ झोपेत असताना आश्विनीने त्याचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहर उठत नसल्याचा कांगावा करत आश्विनीने त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं. परंतू डॉक्टरांनी त्याला उपचारानंतर मृत घोषित केलं.

हे वाचलं का?

दोन्ही आरोपींना या प्रकरणात शवविच्छेदन होणार नाही असं वाटलं होतं. परंतू मनोहरचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. यामध्येही मृत्यूचं ठोस कारण समोर आलं नाही. ससून रुग्णालयाने याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. यानंतर मनोहरच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यानच्या काळात पोलीस आश्विनी आणि गौरववर पाळत ठेवून होते. एक दिवस मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गौरवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT