राष्ट्रपतींच्या ताफ्यासाठी वाहतूक अडवली, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू

रामनाथ कोविंद यांनीही घेतली घटनेची दखल, घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त
राष्ट्रपतींच्या ताफ्यासाठी वाहतूक अडवली, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू

कानपूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याला गालबोट लागलं आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्याला वाट मोकळी करुन देण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला होता. यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन एका महिलेला शनिवारी आपला जीव गमवावा लागला. वंदना मिश्रा असं मृत महिलेचं नाव असून ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे मिश्रा यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल करणं जमलं नाही, ज्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी कानपूर शहरात शनिवारी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते. शनिवारी गोविंदपूरी पुलावर यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. वंदना मिश्रा याच वाहतूककोडींत अडकल्या. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी या कोंडीतून सुटका करुन द्यावी अशी विनंती मिश्रा यांच्या कुटुंबाने पोलिसांकडे केली, परंतू पोलिसांनी ही मागणी मान्य केली नाही. अखेरीस वंदना मिश्रांना रुग्णालयात पोहचेपर्यंत उशीर झाला. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून घडलेल्या प्रकाराबद्दल आपला शोक व्यक्त केला आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनीही याप्रकाराबद्दल माफी मागितली असून घटनेची संपूर्ण चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कानपूरचे पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून या घटनेची माहिती घेतली. यावेळी आपला शोकसंदेश मिश्रा कुटुंबापर्यंत पोहचवण्याचं आदेश राष्ट्रपतींनी दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात कानपूर पोलिसांनी एक पोलीस उप-निरीक्षक आणि ३ हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in