Beed District : ऊस ठरला आत्महत्येचं कारण! उभं पीक पेटवून देत तरुण शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य

तयार झालेलं पीक कोणताही कारखाना घेत नसल्यामुळे शेतकऱ्याने संपवलं जीवन
Beed District : ऊस ठरला आत्महत्येचं कारण! उभं पीक पेटवून देत तरुण शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य

बीड जिल्ह्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून या प्रश्नाने पहिला बळी घेतला आहे. तोडणीला आलेला अतिरीक्त उस कारखाना घेऊन जात नसल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याने उभं पीक पेटवून देत गळफास घेत आत्महत्या केली आहे.

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन नामदेव जाधव या 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नामदेव जाधव याने दोन एकर शेतीत उसाची लागवड केली होती. यासाठी नामदेवने सुमारे 1 ते सव्वा लाख रुपये खर्च केले. मात्र उस तयार झाल्यानंतरही कोणताही कारखाना उस गाळपाला घेत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून नामदेव परिसरातील अनेक कारखान्यांमध्ये उसासाठी चकरा मारत होत्या. परंतू प्रत्येक कारखान्यातून नामदेवच्या पदरी निराशाच पडली.

ज्यामुळे निराशेपोटी नामदेव जाधव याने उभं पीक पेटवून देत गळफास घेत आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं.

दरम्यान बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला असून जवळपास 30 ते 40 हजार मेट्रीक टन ऊस अद्यापही बीड जिल्ह्यात शिल्लक असल्याचे सांगितलं जातंय. विशेष म्हणजे एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असताना देखील कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. यामुळे तळहाताच्या फोडासारखा जपलेला ऊस कुठे घालावा ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढं उभा ठाकलाय. त्यामुळे आता संतप्त आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांकडून टोकाचं पाऊल उचललं जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झालय. त्यामुळे आता साखर आयुक्त आणि सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिली आहे..

Related Stories

No stories found.