Bullock Cart Race: पुन्हा एकदा धुरळा... बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी!

Supreme Court conditional permission Bullock cart Race: सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सर्शत परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात धुरळा उडणार आहे.
Bullock Cart Race: पुन्हा एकदा धुरळा... बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी!
supreme court conditional permission bullock cart race important news for maharashtra(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: India Today)

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील अवघ्या बैलगाडा शौकिनांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असाच म्हणावा लागणार आहे. कारण गेली अनेक वर्ष ज्या बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. त्याला अखेर सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. आता याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याने आता अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. यामुळे बैलगाडा मालक, चालक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी अशी मागणी सातत्याने सुरु होती. यासाठी कोर्टात आणि सरकारकडे अनेकांनी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला आता यश आलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव, राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे, मंत्री सुनील केदार, दिलीप वळसे-पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

गुरुवार (16 डिसेंबर) न्या. खानविलकर, न्या. रविकुमार आणि न्या. माहेश्वरी या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बैलगाडा शर्यतीबाबत सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.

बैलगाडा शर्यत हा लोकाश्रय असलेला अत्यंत पारंपारिक खेळ आहे. तसेच या शर्यतींवर महाराष्ट्रातील अनेक भागामधील अर्थचक्र देखील अवलंबून आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती.

तेव्हापासून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. यामुळे याबाबत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी घेत आता सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

बैलगाड्या शर्यती बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी सीनियर कौन्सिल तसेच ॲड.सचिन पाटील यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या.

महाराष्ट्र राज्याने 2017 साली बैलगाडा शर्यतबाबत केलेला कायदा व त्या अंतर्गत गठित नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल असं राज्य सरकारच्या वतीने कोर्टात स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यासाठी युनिफॉर्म पोझिशन समान न्याय गृहीत धरून बैलगाडा शर्यतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून महाराष्ट्र शासनाने बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत 1960 चा कायद्याला अनुसरून जी नियमावली केली आहे त्या नियमावलीला अधीन राहून बैलगाड्या शर्यती सुरू करण्यास आता सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे.

supreme court conditional permission bullock cart race important news for maharashtra
बैलगाडा शर्यतीवर आढळराव-वळसे पाटलांमध्ये टोलेबाजी, शर्यतीचं आयोजन करण्यावर आढळराव ठाम

विस्तारित खंडपीठ सर्वोच्च न्यायालय यांच्या अंतिम निकालापर्यंत ही बैलगाडा शर्यतीवरील स्थगिती उठविण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील बैलगाड्या शर्यती सुरू होण्यास असलेला अडथळा दूर झालेला आहे. अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in