"ईडीची नोटीस किंवा पाऊस आला की, राष्ट्रवादीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येतो"

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान : 'पुढल्या काही महिन्यात गोड बातमी आपल्याला या भागातून मिळेल'
"ईडीची नोटीस किंवा पाऊस आला की, राष्ट्रवादीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येतो"
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे. ScreenGrab

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेली पावसातील सभा आणि ईडीच्या नोटिसा यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ईडीची नोटीस आली किंवा पाऊस पडला, तर राष्ट्रवादीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यांच्या विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बावधन परिसरात रुग्णावाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे राजकीय टोलेबाजी करताना ईडीच्या कारवाईवरही निशाणा साधला. त्याचबरोबर ईडीची नोटीस आणि पाऊस दोन्ही राष्ट्रवादीसाठी चांगले संंकेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

'निवडणुकीच्या आधी जो इच्छुक असेल... मी राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्रॅक रेकॉर्ड सांगतेय. दोन गोष्टी होतात. ईडीची नोटीस आली किंवा पाऊस पडला, आपली जागा शंभर टक्के निवडून येते. इथे तिकीट कुणाला मिळेल मला माहिती नाहीये. जे-जे इच्छुक इथे असतील आणि ते इथं भिजले असतील, तर नक्की निवडून येणार. काळजी करू नका, समझो पप्पु पास हो गया. पुढल्या काही महिन्यात गोड बातमी आपल्याला या भागातून मिळेल', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ईडीची नोटीस, पाऊस आणि राष्ट्रवादी कनेक्शन?

राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकार्ड आहे, असं म्हणत पाऊस आणि ईडीच्या नोटिसीबद्दल भाष्य केलं. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या घटनांनाही उजाळा मिळाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सोडून गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणुकीत काय होईल, अशीच चर्चा सगळीकडे होती.

त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेत थेट ईडी कार्यालयात पाऊल ठेवलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढल्याचं चित्र निर्माण झालं होतं. ईडीच्या नोटिसीनंतर शरद पवारांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्यानं विधानसभा निवडणुकीवेळीच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली. यावेळी शरद पवारांनी पाऊस सुरू असतानाच सभा घेतली. या सभेचे परिणाम विधानसभा निवडणुकीच्या आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून दिसून आले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in