'ही शक्यता नाकारता येणार नाही'; संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शिंदे गटाच्या प्रतिक्रियेवर सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नाराजी, काँग्रेसचा भाजपवर निशाणा
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मांडली भूमिका
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मांडली भूमिका

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. दोन वेळा समन्स बजावल्यानंतर चौकशीला उपस्थित न राहिलेल्या संजय राऊतांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं. ईडीकडून सुरू असलेल्या संजय राऊतांच्या चौकशीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "संजय राऊतांच्या घरी रेड झालेली आहे. मध्यंतरी त्यांना समन्स आलेलं होतं. मला विश्वास आहे की, कुठलीही एजन्सी जेव्हा आपल्याकडे येते, तेव्हा त्यांना सहकार्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संजय राऊत त्यांना सहकार्य करतील."

राहुल गांधी, सोनिया गांधींचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'संजय राऊत सहकार्य करतील'

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतोय का? असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "याबाबतची आकडेवारीच हेच सांगतेय. सातत्याने आम्हाला हे जाणवतंय. हे होत आहे. आम्ही काँग्रेस पक्षासोबत उभे राहिलो. यासदंर्भात आम्ही संसदेत निदर्शनं करू कारण देशातील सर्वोच्च ठिकाण आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांना अनेकवेळा बोलावण्यात आलं. त्यांनी सहकार्य केलं. मला पूर्ण विश्वास आहे की, एजन्सीला जसं सहकार्य गांधी कुटुंबाने केलं, तसंच संजय राऊत करतील," अशी भूमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मांडली भूमिका
संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?

संजय राऊतांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर शिंदे गटातील काही आमदारांनी आनंदी सूर लावला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हे खूप दुर्दैवी आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात विरोधक हा विचारांचा विरोधक होता. कधी कुणी एकमेकांवर वैयक्तिक टीका केली नाही. गेली ५५ वर्ष शरद पवार यांच्यावर अनेक लोकांनी टीका केली, पण त्यांनी कधी उत्तर दिलं नाही. भारतीय संस्कृती त्यांनी (शरद पवार) जपली. तोच विचार यशवंतराव चव्हाण यांचा होता. महाराष्ट्रातील असंख्य नेत्यांचा होता. शरद पवारांनी तो पुढे नेला."

"अनेक लोकांचे व्हिडीओ आले. ऑडिओ आले. बरंच काही झालं, पण आम्ही पक्ष म्हणून कधीही कुणाबद्दल असं बोलणार नाही. आमची लढाई विचारांची आहे. आमचा कोणीही वैयक्तिक विरोधक नाही. आम्ही ते पाळण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रवादी काँग्रेसने पाळलेलं आहे. त्यांना काय बोलायचं हे मी सांगू शकत नाही. पण कुणाबद्दल कितीही वैचारिक लढाई असेल, पण त्यांना अटक व्हावी, असा विचार पण करणार नाही बोलणं तर दूरच," अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील प्रतिक्रियेला उत्तर देताना मांडली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मांडली भूमिका
Patra Chawl land scam case : ईडीचं पथक खासदार संजय राऊतांच्या घरी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. यावरून भाजपला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांचं प्रकरण समोर आणल्याची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरही सुप्रिया सुळेंनी मत मांडलं. "हे असं असूही शकतं. ही शक्यता नाकारता येणार नाही. मला एवढंच म्हणायचं की आपण पूर्ण ताकदीने लढावं. माझा या देशाच्या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की दूध का दूध पाणी का पाणी झालेलं दिसेल. जे काही होतंय. आज ज्या पद्धतीने, ईडी वगैरे बाजूला ठेवा पण आज राजकारणात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. हे दुर्दैवी आहे. हे थांबलं पाहिजे. देशाच्या आणि राज्याच्या समोर असलेल्या विषयांकडे (अर्थव्यवस्था, बेरोजगारी) आपण लक्ष दिलं पाहिजे."

उद्देश स्पष्ट आहे, आमच्यात सामील व्हा, नाहीतर तुरुंगात जा -काँग्रेस

ईडीकडून सुरू असलेल्या संजय राऊतांच्या चौकशीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, "विरोधक आणि ईडी, सीबीआयच्या धाडी हे एक समीकरण झालं आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग या आता तपास यंत्रणा राहिलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी हे विरोधकांना नमवण्यासाठी राजकीय टूल झालं आहे. त्याच्याच एक भाग म्हणजे आज संजय राऊतांकडे रेड होतं आहे. मला एक कळत नाही की, तुमच्याकडे सगळ्या गोष्टींच्या नोंदी आहेत, तर मग आरोपपत्र का दाखल करत नाही. सारखं सारखं चौकशीला बोलवायचं. भीती दाखवायची. याचा एक उद्देश स्पष्ट आहे की, आमच्या पक्षात सामील व्हा नाहीतर तुरुंगात जायला तयार रहा", असा आरोप अतुल लोंढे यांनी केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in