
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या सभेतच आपल्यावर हीप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे हे जाहीर केलं होतं. तसंच पायाचं हे दुखणं बळावल्याने आणि अयोध्येत मनसे सैनिकांच्या विरोधात कट रचला जात असल्याचं आपल्याला कळल्याने आपण अयोध्या दौरा रद्द केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
आपण जाणून घेऊ की हीप बोनचा हा आजार काय? त्याची नेमकी लक्षणं काय?
सध्याची जीवनशैली प्रचंड बदलली आहे. त्याचा परिणाम अर्थातच आरोग्यावर आणि शरीरावर होतो. अचानकपणे काही आजार उद्भवू शकतात. त्यामुळे बैठी जीवनशैली ही घातक ठरू शकते हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं आहे. अशा प्रकारच्या काही त्रासांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. असाच एक त्रास म्हणजे हिप बोन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास.
हिप बोन म्हणजे नेमकं काय?
हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना आणि त्यामुळे पायाला होणारा त्रास किंवा वेदना. हा त्रास रोज जाणवतोच असं नाही तर अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात तणाव जाणवतो. हिपबोनचा त्रास हा सांध्यांमध्ये जास्त जाणवतो. स्नायू आणि हाडांवर येणारा दबाव यामुळे हा त्रास होतो.
हिप बोनचा त्रास नेमका का होतो?
शरीरात कॅल्शियमची कमतरता असणं
एकाच स्थितीत बसून बराच वेळ काम करत राहणं
बदलती जीवनशैली हे एक प्रमुख कारम
ठराविक वेळेनंतर वाढलेले कामाचे अधिक तास यामुळेही हिप बोनचा त्रास उद्भवू शकतो.
महिला आणि पुरूष अशा सगळ्यांनाच हिप बोनचा त्रास जाणवू शकतो. मात्र ही समस्या महिलांमध्ये जास्त पाहण्यास मिळते. एकाच स्थितीत उभं राहणं, एकाच स्थितीत बराच वेळ बसून राहणं याचे हे दुष्पणरिणाम असतात.
पुण्यातल्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?
''मी काही दिवसांपूर्वी पुण्यात आलो त्यावेळी माझं पायाचं दुखणं बळावलं. मी दोन दिवस पुण्यात काही नव्हतं म्हणून मुंबईला गेलो. त्या दरम्यान डॉक्टरांशी बोललो. फिजिओथेरेपी वगैरे घेतली. पण जरा प्रकरण वाढलं असल्याने १ जूनला शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया माझ्या हिपबोनची होणार आहे. हे का सांगितलं? कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो तर आमचे पत्रकार बांधव कुठचा अवयव बाहेर काढतात भरवसा नाही. सगळी ओढाताण करण्यापेक्षा आपण सांगून टाकावं कसं ऑपरेशन आहे. ''
आता राज ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना दोन महिने आराम करावा लागणार आहे.