"आम्ही १९९० मध्येच कश्मीर सोडायला हवं होतं, थांबून आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं"

कश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली... दहशतवाद्यांनी मेडिकलमध्ये घुसून कश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या...
कश्मिरातून निघून गेलेल्या कश्मिरी पंडिताचं घरं. (संग्रहित छायाचित्र)
कश्मिरातून निघून गेलेल्या कश्मिरी पंडिताचं घरं. (संग्रहित छायाचित्र)(Photos: Bandeep Singh)

कश्मीर खोऱ्यात दहशतवादी पुन्हा रक्तपात घडवताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत ७ जणांच्या हत्या करण्यात आल्या असून, यात एका कश्मिरी पंडिताचाही समावेश आहे. बाळकृष्ण भट्ट मयत कश्मिरी पंडिताचं नाव असून, अतिरेक्यांच्या हल्ल्यानं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. कश्मिरीमध्ये राहण्याचा निर्णय चुकला असं सांगताना त्यांच्या भावाला अश्रू अनावर झाले.

द कश्मीर फाईल्समुळे विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांचा मुद्द्यावर चर्चा झडताना दिसत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल प्रश्न विचारले जाता आहेत. बोललं जात आहे. याच दरम्यान, कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून परप्रांतीयांसह कश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. दोन दिवसांत कश्मीर खोऱ्यात ७ जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या ७ जणांच्या हत्यांमध्ये एका कश्मिरी पंडिताचाही समावेश आहे. जम्मू कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सोमवारी सायंकाळी कश्मिरी पंडित बाळकृष्ण भट्ट उर्फ सोनू यांची गोळ्या घालून हत्या केली.

दहशतवाद्यांनी दुकानात घुसून केलेल्या गोळीबारात बाळकृष्ण पंडित यांना तीन गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या बाळकृष्ण भट्ट यांना तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. बाळकृष्ण भट्ट यांचं मेडिकल होतं. १९९० मध्ये कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी त्यांनी कश्मिरातच राहण्याचा निर्णय घेतला. मागील ३० वर्षांपासून ते कश्मिरातच राहत होते.

बाळकृष्ण भट्ट यांच्या निर्घृण हत्येनं त्यांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. त्यांचे बंधू अनिल कुमार भट्ट यांना घटनेविषयी बोलताना हुंदका अनावर झाला. "आम्ही १९९० मध्येच कश्मीर सोडायला हवं होतं. कश्मिरात राहून खूप मोठी चूक केलीये. आयुष्य उद्ध्वस्त केलं. कश्मिरात हिंदू राहावेत असं कुणालाही वाटत नाही. लोकांचा केवळ आमच्या संपत्तीवर डोळा आहे. लोकांनी कश्मिरी पंडितांच्या स्मशानभूमीची जागाही सोडली नाही. त्यावरही घरं बांधली आहेत," असं सांगताना अनिल भट्ट यांना अश्रू अनावर झाले.

"कश्मिरी पंडितांना पुनर्वसन करू न शकणं हे अपयशच"

कश्मीर खोऱ्यात पुन्हा हल्ले होत असून, या घटनांवर बोलताना जम्मू कश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य म्हणाले, "कश्मिरी पंडित पूर्णपणे कश्मिरातून निघून जावे म्हणून हा कट्टर इस्लामिक अजेंडा आहे. कश्मिरातील उरल्या सुरल्या कश्मिरी पंडितांना हाकलून लावण्याची तयारी केली जात आहे. याच अजेंड्यानुसार कश्मिरात एक दिवस आधी परप्रांतीय मजुरावर हल्ला करण्यात आला होता. कलम ३७० हटवल्यानंतरही जर कश्मिरी पंडितांचं कश्मिरात पुनर्वसन केलं गेलं, तर हे फार मोठं अपयशच ठरेल," असं एस.पी. वैद्य म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in