
ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज वाराणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. या प्रकरणी आता २६ मे रोजी सुनावणी होणार आहे. आज तारीख मिळाल्यानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या आदेशाच्या याचिकेवर ७ ११ सीपीसी अंतर्गत याचिकांवर २६ मे रोजी सुनावणी पार पडणार आहे.
ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या मागण्या काय आहेत?
शृंगार गौरीच्या मंदिरात रोजच्या पूजेची मागणी
वजू खान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी
नंदीच्या उत्तरेकडची भिंत तोडून डेब्रिज हटवलं जावं
शिवलिंगाची लांबी आणि रूंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावं
वजू खान्यात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी
मुस्लिम पक्षाने काय म्हटलं आहे?
वजूखाना सील करण्यास विरोध
१९९१ च्या कायद्याच्या अंतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि खटल्यावरच प्रश्नचिन्ह
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीचा वाद काय?
१८ ऑगस्ट २०२१ ला वाराणसीतल्या पाच महिलांनी श्रृंगार गौरी मंदिरात रोज पूजा करण्याची आणि दर्शन घेण्यासाठी मागणी पुढे करत कोर्टात याचिका दाखल केली होती. या नंतर जज रवि कुमार दिवाकर यांनी मंदिरात सर्व्हे आणि व्हीडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी १० मे पर्यंत अहवाल द्यावा असंही सांगितलं आहे. याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद यांचा वाद आजचा नाही. हा वाद १९९१ पासून कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद येथील हायकोर्टात सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद यांच्यातला वाद काही प्रमाणात अयोध्यासारखाच आहे.
या वादामध्ये अनेक पैलू आहेत. अयोध्या प्रकरणात मशीद होती आणि मंदिर तयार झालं नव्हतं. मात्र या प्रकरणात मंदिर आणि मशीद दोन्ही तयार आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षकारांचं म्हणणं हे आहे की मशीद तिथून हटवण्यात यावी आणि ती जमीन मंदिराला मिळावी. कारण मशीद ही मंदिर तोडून बांधण्यात आली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मशीद हटवण्यात यावी आणि ती जागा आम्हाला देण्यात यावी असं हिंदू पक्षकरांचं म्हणणं आहे.