
एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याप्रकरणी महिलेने तिच्या पतीविरोधात म्हणजेच या मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातल्या पुरंदर भागात ही घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यात असलेल्या चांबली या गावात एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी याबाबत माहिती दिली. ज्या महिलेने पतीविरोधात तक्रार दिली ती तिच्या माहेरी वास्तव्य करते. तिचा पती राजू पवार गावोगावी जाऊन मजुरीचं काम करतो. राजूने सहा महिन्यांपूर्वी 13 वर्षांच्या मुलीलाही सोबत ठेवलं होतं. या दरम्यान राजूने त्याच्या अल्वपयीन मुलीचं लग्न कुणालाही कल्पना न देता लावून टाकलं. 17 जूनला ममताला(तक्रारदार महिला) एका नातेवाईकाकडून याबाबत माहिती मिळाली. तिने मुलीच्या लग्नाचा फोटो पाहिला आणि तो घेऊन थेट सासवड पोलीस ठाणं गाठलं. ज्यानंतर पोलिसांनी या महिलेचा पती राजू पवारसहीत, अबू रमेश पवार, राजकन्या पवार, मुकेश रमेश पवार, अजय रमेश पवार यांच्यावर बाल विवाह विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास आता पोलीस करत आहेत.