Exclusive : Narayan Rane यांची अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जाणून घ्या नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Exclusive : Narayan Rane यांची अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिवसभर हे प्रकरण गाजलं. शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहण्यास मिळाला. त्यानंतर गोळवलीमधून नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटक करण्यात आली. या सगळ्या प्रक्रियेनंतर नारायण राणे यांच्याशी इंडिया टुडे, आज तकचे Senior Executive Editor साहिल जोशी यांनी व्हीडिओ कॉल द्वारे संवाद साधला. नारायण राणे यांनी मुंबई तकशी बोलताना अटकेबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

'मी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य दिनी जर त्यांना हे माहित नाही की देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव आहे तर त्यादिवशी जर मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती. राष्ट्राला जे स्वातंत्र्य मिळालं त्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही म्हणून मी हे वक्तव्य केलं होतं. आता बळाचा वापर करून मला अटक करण्यात आली आहे. जबरदस्ती अटक करण्यात आली आहे. काही कारण नसताना माझ्या जिवितास धोका निर्माण होईल असं वर्तन पोलीस करत आहेत. चार FIR माझ्याविरोधात दाखल करण्यात आल्या आहेत, 100 केल्या तरीही हरकत नाही. त्यांच्या हातात कायदा आहे.

मुख्यमंत्र्यांचा मुलगा जेव्हा सुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अडकला तेव्हा त्याला कसं वाचवलं? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला. आता तुमच्या अटकेनंतर केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष सुरू होईल का? असं विचारलं असता राणे म्हणाले, राज्य आमच्याशी संघर्ष करूच शकत नाही. माझी अटक असंवैधानिक आहे असंही नारायण राणे म्हणाले. कायद्याचा जो काही गैरवापर होतो आहे ते मी पाहतो आहे, जे कुणी यामध्ये गुंतले आहेत त्यांच्यावर मी कारवाई करणार आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्यांवरुन टीका केली. सुरुवातीला नारायण राणेंनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन यावरुन बरीच मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली.

'या माणसाकडे कोणातीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.' असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

या टीकेचे पडसाद आज दिवसभर राज्यभर दिसले. त्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर नारायण राणे यांनी मुंबई तकशी बोलताना एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in