...तर एकदिवस आत्महत्या करायची वेळ येईल ! नितीन गडकरींचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला

सोलापुरातील कार्यक्रमात बोलत असताना गडकरींचं वक्तव्य, साखर कारखानदारांनीह दिला मोलाचा सल्ला
...तर एकदिवस आत्महत्या करायची वेळ येईल ! नितीन गडकरींचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला

महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचा मुद्दा हा नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारची साथ सोडली. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये उसाची शेती केली जाते. परंतू या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोलाचा सल्ला देत उसावर जास्तकाळ अवलंबून राहू नका असा सल्ला दिला आहे.

नितीन गडकरी सोलापुरात विविध राष्ट्रीय महामार्गांच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. "तुम्ही जर शेतीला पाणी उपलब्ध करुन दिलत तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता. परंतू आताच मला आमदार बबनदादा सांगत होते की यंदा 22 लाखांचा ऊस सोलापूरमध्ये गाळप झाला. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा ऊस जर असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येईल."

गेल्या काही काळात आपल्याकडे साखरेचं उत्पादन सरप्लस झालं आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे ब्राझीलच्या मंत्र्यांचं एक शिष्ठमंडळ आलं होतं. तिकडे सध्या दुष्काळ पडला आहे. बबनदादा तिकडे दुष्काळ पडलाय म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आता हसू आहे. पण तिकडे परिस्थिती नियंत्रणात आली आणि साखरेचं उत्पादन वाढलं तर दर 22 रुपयांवर येतील पण तुम्हाला दर कमी करता येणार नाहीत. कारण तुम्हाला इथे राजकारण करायचं आहे. मग काय परिस्थिती होते ती पाहा. म्हणूनच मी उसापासून इथेनॉल तयार करा असा सल्ला सर्वांना देतो, असं गडकरी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल विधान करताना ऊस हे आळसाचं पीक असल्याचं विधान केलं होतं. उस्मानाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

काय म्हणाले होते शरद पवार?

"ऊस हे आळशाचं पीक आहे. रान तयार केलं, पाण्याची व्यवस्था केली की मग काहीच चिंता करायची गरज नाही. त्यानंतर त्याठिकाणी कोणी ढुंकुनही बघत नाही. गडी मोकळा होतो. गावाच्या चावडीवर जातो आणि पंतप्रधान मोदींपासून ते गावात काय चाललंय याची चर्चा करत बसतो. ही अवस्था सध्या आमच्या ऊस वाल्यांची आहे". शरद पवारांच्या या विधानावर अनेक शेतकरी नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

Related Stories

No stories found.