Exclusive: मुंबईत तूर्तास लॉकडाऊन नाही: मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
मुंबईत तूर्तास लॉकडाऊन नाही
मुंबईत तूर्तास लॉकडाऊन नाही

मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना मुंबईत देखील कोरोनाचं रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अमरावती आणि इतर काही ठिकाणी आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे आता मुंबईत देखील लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मुंबईकरांच्या मनातील हाच प्रश्न आम्ही थेट मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना विचारला. 'मुंबई तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी लॉकडाऊन होणार की नाही याबाबत थेट उत्तर दिलं आहे.

'मुंबईत तूर्तास तरी लॉकडाऊन होणार नाही किंवा अतिरिक्त निर्बंध लावले जाणार नाही. पण जे काही नियम आणि निर्बंध सध्या लागू आहेत ते कठोरपणे राबविले जाणार आहेत.' असं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरीही कोरोनाबाबत सर्तक राहणं आणि सर्व नियम पाळणं हे गरजेचं आहे.

पाहा मुंबई महापालिका आयुक्तांची संपूर्ण मुलाखत

'14 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान आम्ही जो अभ्यास केला त्यात रूग्णसंख्या वाढली. पॉझिटिव्हीटी रेट हा पावणेसहा टक्के गेला आहे हे काही चांगलं लक्षण नाही. यवतमाळ, नागपूरमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपर्यंत गेला आहे. मुंबईत ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून SOP कठोर करणार आहोत. लग्नांमध्ये ५० पेक्षा जास्त लोक असतील तर नवरा-नवरीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. मंदिरांमध्ये महिला मार्शल्स असणार आहेत, गर्दी होणार नाही कोरोना नियमांचं उल्लंघन होणार नाही हे पाहिलं जाईल. याशिवाय मुंबईत मैदानावर खेळणाऱ्या मुलांना देखील मास्क वापरणं हे अनिवार्य असणार आहे. कारण सध्या मास्क म्हणजे एक प्रकारे व्हॅक्सिनच आहे. जर मास्क वापरला तरच आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. शासनाची इच्छा नाही लॉकडाऊन करण्याची पण आता सर्व काही लोकांच्या हाती आहे.' असंही यावेळी आयुक्त म्हणाले.

ही बातमी देखील पाहा: '..पुन्हा लॉकाडऊन परवडणार नाही' राजेश टोपेंचं महाराष्ट्राला पत्र

'15 मार्चपासून 55 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दिली जाणार लस'

'गेल्या एप्रिल मे आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. आता आम्ही पुढील आठवडाभर रुग्णसंख्येचा अभ्यास करुन निर्णय घेऊ. आता ट्रेन सुरु होऊन 3 आठवडे झाले आहेत. त्यादृष्टीने देखील काही गोष्टी विचारात घेतल्या जातील. त्यामुळे दहा दिवसानंतर आपल्याला नेमकी स्थिती समजू शकणार आहे. दुसरीकडे आता केंद्राने आता लसीकरण सुरु केलं आहे. पण आमचा असा प्रयत्न असणार आहे की, 15 मार्चपासून 55 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लोकांना लस दिली जाईल. मुंबईत सध्या जे 35 मोठे खासगी हॉस्पिटल आहेत तिथे देखील सर्वांना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु होणार आहे.' अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली.

'लोकल म्युटेशनमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ'

'दहा दिवसानंतर आपल्याला कोरोनाबाबतचा नेमका ट्रेंड कळणार आहे. आपण गेल्या काही महिन्यांपासूनच इंटरनॅशनल एअरपोर्टवर लोकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करतो आहोत. तसेच त्यांना सक्तीने सात दिवसासाठी क्वॉरंटाइन करत आहोत. आता सध्या जे काही कोरोना रुग्ण वाढत आहेत ते लोकल म्युटेशनमुळे आहेत.' असं आयुक्त म्हणाले.

इकडे देखील लक्ष द्या: विनामास्क घराबाहेर पडताय? मग मुंबई पोलिसांच्या कारवाईला तयार रहा

'काळजी करण्याचं कारण नाही, मुंबई महापालिका पूर्ण तयारीनिशी सज्ज'

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई महापालिका ही पूर्णपणे सज्ज आहे. आजच मी सर्व महत्त्वाच्या हॉस्पिटल्स आणि प्रशासनाची झूमद्वारे बैठक घेतली. यावेळी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या आपल्याकडे 22 हजाराहून अधिक बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने काहीही काळजी करण्याचं कारण नाही.' असं म्हणत आयुक्त चहल यांनी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंबर कसली असल्याचं सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in