
नितीन शिंदे, पंढरपूर: 'मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपची जातीय तेढ निर्माण करणारी भाषा करीत आहेत. मात्र भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंव्हा पक्षाला संपवले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत.' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना दिला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात संतछाया वारकरी भवन भूमिपूजन संत मंडळींच्या हस्ते पंढरपूर मध्ये करण्यात आले. या कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केलं आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे भाषण केलं आणि महाविकास आघाडीविरोधात जी भूमिका घेतली त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपजवळ गेले आहेत. ज्या राज ठाकरेंनी 2019 निवडणुकीत मोदी-शाहांविरोधात प्रचार केला त्याच राज ठाकरेंनी आपली भूमिका आता बदलली असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना भाजपच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे.
पाहा रोहित पवार राज ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले
'मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपची जातीय तेढ निर्माण करणारी भाषा करीत आहेत. मात्र भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंवा पक्षाला संपवलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत.'
'सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत.' असा असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
रोहित पवारांनी संजय राऊतांनाही सुनावलं!
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टिका केली होता. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांचे कान टोचले आहेत. 'कारवाई केल्यानंतर चीड येते ती त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेनेच कारवाई करत आहे. त्यामुळे तीव्र अशा पद्धतीने भावना व्यक्त केली जात आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे.' असा सल्ला आमदार पवार यांनी दिला आहे.