
मुंबई: 'शरद पवारांना ईडी माहित नव्हतं तर त्यांचं बौद्धिक दारिद्र्य आहे. कारण ईडीचा कायदा हा 2005 साली आला. PMLA चा कायदा.. आता त्या काळात हे खासदार असताना त्यांना हा कायदा पास केला हेच त्यांना माहित नसेल तर शरद पवारांविषयी मी काय बोलणार?', अशी टीका भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली आहे. मुंबई Tak सोबत बोलताना त्यांनी चौफर फटकेबाजी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत आता विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. याचविषयी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'पूर्वी ईडी काय आहे हे कुणालाही माहित नव्हतं. पण आता ईडी हे गावोगावी माहित पडलं आहे.' अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
मात्र, शरद पवार यांच्या याच टीकेवर भाजप नेते भातखळकर यांनी जहरी टीका केली. एवढंच नव्हे तर त्यांनी महाविकास आघाडीवरच अतिशय बोचऱ्या शब्दात टीकेचे बाण सोडले. पाहा अतुल भातखळकर नेमकं काय-काय म्हणाले.
'हे तर शरद पवारांचं बौद्धिक दारिद्र्य'
'शरद पवारांना ईडी माहित नव्हतं तर त्यांचं बौद्धिक दारिद्र्य आहे. कारण ईडीचा कायदा हा 2005 साली आला. PMLA चा कायदा.. आता त्या काळात हे खासदार असताना त्यांना हा कायदा पास केला हेच त्यांना माहित नसेल तर शरद पवारांविषयी मी काय बोलणार?' अशी टीका भातखळकर यांनी केली.
'शरद पवार यांची मळमळ एवढीच आहे की...'
'शरद पवार यांची मळमळ एवढीच आहे की, आपण एवढे प्रयत्न केले तरी दाऊद समर्थक आपल्या मंत्र्याला आपण वाचवू शकत नाही न्यायालयातून सुद्धा त्याला दिलासा न मिळता फटकारेच बसतात. याचं दु:ख पवारांना आहे एवढाच त्याचा अर्थ आहे.' असं म्हणत भातखळकरांनी पवारांवर निशाणा साधला.
'त्या दिवशीच आमचे शिवसेनेसोबत संबंध संपले..'
'ही लोकं फक्त राजकीय कांगावा करतात आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या संबंधांचा प्रश्न आहे तर त्यांचे आणि आमचे संबंध तेव्हाच संपले जेव्हा त्यांनी ऑक्टोबर 2019 हिंदुत्व सोडलं, मराठी बाणा सोडला. तेव्हाच त्यांचे आणि आमचे राजकीय संबंध संपलेले आहेत. कुठलीही निवडणूक किंवा कोणतंही सरकार आम्ही त्यांच्या बरोबर बनवणार नाही. हे आम्ही वारंवार स्पष्ट केलं आहे.' असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेसोबत आता भाजप कधीही युती करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
'एक गटारगंगा बंद झाली आहे, आता दुसऱ्या गटारगंगेने देखील सावध राहावं.. एवढंच सांगतो'
'संजय राऊतांचं काय आहे शब्द बापुडे केवळ वारा.. अशी राऊतांची अवस्था आहे. राऊत जे शब्द आमच्याकरिता वापरतात ते मी वापरु शकतो. पण मी महाराष्ट्राची संस्कृती पाळणारा एक नागरिक आहे. त्यामुळे मी वाईट भाषेत बोलत नाही. त्यामुळे संजय राऊतांना म्हणावं एक ईडीची नोटीस आली तर एवढा थयथयाट केलात. संजय राऊतांना एवढंच सांगतो. तीन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. दोन गटारगंगा महाराष्ट्रात वाहतायेत एक गटारगंगा बंद झाली आहे, आता दुसऱ्या गटारगंगेने देखील सावध राहावं. एवढंच सांगतो.' अशी जहरी टीका भातखळकरांनी केली आहे.
'आमच्याविरोधात पुरावा असता ना तर आतापर्यंत यांनी ठेवलं असतं का आम्हाला?'
'25 हजार कोटींचा महाघोटाळा आमच्या काळात झाला असा आरोप राऊतांनी केला. आम्ही काय म्हटलं चौकशी करा. तुमच्याकडे देखील विविध यंत्रणा आहेत. करा ना चौकशी आमची.. काय झालं जलयुक्त शिवार चौकशीचं, काय झालं वृक्ष लागवडीच्या चौकशीचं.. आमचा दामन साफ आहे त्यामुळे एवढ्या वल्गना वैगरे हे लक्षात ठेवा.'
'आम्ही असं काही म्हणतच नाही की, आमची चौकशी करु नका. खुशाल चौकशी करा. आम्ही तयार आहोत. तुमच्याकडे पुरावे नाही. आम्ही तर सांगतोच आहोत की, करा ना चौकशी.. अडीच वर्ष झाली का नाही केलीत चौकशी? एवढं नतद्रष्ट, खुनशी, भ्रष्टाचारी सरकार हे आहे.. आमच्याविरोधात एवढा जरी पुरावा असता ना तर आतापर्यंत यांनी ठेवलं असतं का आम्हाला?' असा सवाल उपस्थित करत भातखळकर यांनी राज्यातील हे सरकार खुनशी असल्याचं म्हटलं आहे.