'हे सुनियोजित षडयंत्र' अमरावती हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

जाणून घ्या अमरावती प्रकरणावर आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'हे सुनियोजित षडयंत्र' अमरावती हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

अमरावतीमधला एकूणच घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. मी पहिल्यांदा सगळ्यांना शांततेचं आवाहन करतो. कुणीही हिंसाचार करू नये. ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतं आहे. त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही त्या घटनेवर अशा प्रकारे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत या प्रकणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

त्रिपुरा पोलिसांनी स्वतः जी मशिद जाळली म्हणून आंदोलनं होतं आहेत त्यात मशिदीचे फोटो जारी केले आहेत. तसंच सोशल मीडियावर टाकलेले फोटो कसे चुकीचे आहेत हेदेखील सांगितलं आहे. सोशल मीडियावर हे सगळं प्रकरण पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या लोकांवर कारवाईही केली आहे. त्यामुळे कुठलीही मशिद त्रिपुरामध्ये जाळण्यातच आलेली नाही. असं असताना असतानाही त्यासंदर्भाताल्या अफवांवर मोर्चे काढायचे आणि हिंदूंची दुकानं जाळायची ही बाब योग्य नाही. यामध्ये सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षातले नेते स्टेजवर जाऊन भडकाऊ भाषणं देणार असतील तर या हिंसाचाराची जबाबदारी सरकारचीही असेल. अशा प्रकारचे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकानं टार्गेट करणं बंद झालं पाहिजे. दोन्ही समाजाने यासंबंधी शांतता बाळगली पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

समाजकंटकांनी काही दुकानंही पेटवून दिली...
समाजकंटकांनी काही दुकानंही पेटवून दिली...

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. त्रिपुरातील घटनेच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या असून, महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये हिसेंचा उद्रेक झाला. दरम्यान, अमरावतीत आजही (13 नोव्हेंबर) हिंसक घटना घडल्या असून, दगडफेक, तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

त्रिपुरातील हिंसचाराच्या विरोधात शुक्रवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंद दरम्यान, महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेडात हिंसाचाराचा उद्रेक झाला. नांदेड, अमरावती, मालेगावात जमावाने दुकानांची आणि सार्वजनिक मालमत्तांची तोडफोड केली. त्यामुळे तिन्ही शहरात तणाव पसरला आहे.

अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

अचानक दगडफेक सुरु झाल्यानंतर दोन्हीकडील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. मात्र, या धुमश्चक्रीत समाजकंटकांनी काही दुकानं पेटवून दिली. सध्या अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून, वातावरण तणावपूर्ण आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in