Corona च्या नावाखाली वाघ बिळात बसतोय, आता बिळातून बाहेर या - सदाभाऊ खोतांची उद्धव ठाकरेंवर टीका

संसदेचं अधिवेशन महिन्याभराचं चालतं मग राज्याचं अधिवेशन पाच दिवसांचं का? खोतांचा सवाल
Corona च्या नावाखाली वाघ बिळात बसतोय, आता बिळातून बाहेर या - सदाभाऊ खोतांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रीया पार पडली. या यशस्वी शस्त्रक्रीयेनंतर उद्धव ठाकरे आता घरी परतले असून डॉक्टरांनी पुढचे काही दिवस त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. एकीकडे राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य केलंय.

वाघ कोरोनाच्या नावाखाली बिळात जाऊन बसलाय, आता बिळातून बाहेर या असा टोला सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

"तुमच्यात मला वाघाचं एकपण लक्षण दिसत नाही. वाघ डरकाळ्या फोडत बाहेर जातो. पण हा वाघ कोरोनाच्या नावाखाली बिळात जाऊन बसला आहे. आता बिळातून बाहेर या, आम्ही खरा वाघ पाहण्यासाठी उत्सुक आहोत", असा टोला सदाभाऊ खोतांनी लगावला. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे महावितरण कार्यालयावर काढलेल्या मोर्चासमोर बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळचे हिवाळी अधिवेशन फक्त ५ दिवसांचे बोलवण्यात आल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत, देशाचे अधिवेशन जर महिन्याभराचे चालत असेल तर महाराष्ट्राचे अधिवेशन फक्त ५ दिवसांचे का असा सवालही खोत यांनी विचारला. या सरकारला आपला भ्रष्टाचार बाहेर येईल अशी भीती वाटत असल्याने सरकार कोरोनाच्या मागे दडत आहे असा आरोप यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.