
Mask at Home
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जास्त वाढला आहे. आता घरातही Mask लावण्याची वेळ आली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. देशातल्या कोरोना स्थितीबाबत बोलत असताना नीती आयोगातील आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही उगाचच भटकण्यासाठी घराबाहेर पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले डॉ. व्ही. के. पॉल?
कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. दुसऱ्या लाटेत भारतात अनेक रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. अशात घरात कुणी पॉझिटिव्ह आढळलं तर घरातल्या इतर सदस्यांनी घरात असतानाही मास्क लावून राहण्याची वेळ आली आहे. असं न केल्यास कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. मी यापुढेही जाऊन सांगेन की आता घरात राहणाऱ्यांनी तोंडावर मास्क लावून राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोक सध्या बाहेर पडताना मास्क वापरताना दिसत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की आता लोकांनी घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे. ज्या माणसाला कोरोना झाला आहे त्याने तर मास्क लावलाच पाहिजे पण त्याच्या कुटुंबीयांनी मास्क लावणं आवश्यक आहे. जेव्हा कोरोना झालेला रूग्ण घरी आयसोलेशनमध्ये आहे तेव्हाही त्याने मास्क लावूनच राहिलं पाहिजे त्याच्या घरातले सदस्य दुसऱ्या खोलीत असतील तरीही त्यांनी मास्क लावणं अत्यंत आवश्यक बाब झाली आहे असंही डॉ. पॉल यांनी स्पष्ट केलं.
डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले?
ज्या कुणाला कोरोना सदृश लक्षणं आढळतील त्यांनी तातडीने स्वतःला आयसोलेट करून घ्यावं. समजा कोरोनाची लक्षणं आढळली म्हणून तुम्ही RTPCR टेस्ट केलीत तर त्या टेस्टचा निकाल काय येतो याची वाट न पाहता स्वतःला आयसोलेट करा. कुणाच्याही संपर्कात येऊ नका. कदाचित असं होऊ शकतं की तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल तरीही त्याआधी पूर्ण खबरदारी घ्या असंही आज एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.
आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनीही मास्क न घालणं किती धोक्याचं ठरू शकतं ते सांगितलं. अनेक तज्ज्ञांनी मांडलेल्या मतानुसार जर दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येत असतील आणि त्यांनी मास्क लावला नसेल तर ही बाब कोरोना संसर्ग होण्यासाठी 90 टक्के जबाबदार ठरू शकते.
आणखी काय म्हणाले लव अग्रवाल?
लव अग्रवाल यांनी सोशल डिस्टन्सिंगबाबतही भाष्य केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग हे फार महत्त्वाचं आहे. जर याकडे दुर्लक्ष केलं तर कोरोना झालेला एका रूग्णामुळे 30 दिवसात 406 जणांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. सध्या देश कोरोनाशी लढा देतो आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनापासून वाचायचं असेल तर घरातही मास्क घालणं आवश्यक आहे असंही लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे.