
जयपूर: टीना डाबी हे नाव 2015 साली अचानक चर्चेत आलं होतं. कारण याच वर्षी UPSC परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून टीना दाबी हिने अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तेव्हा ती अवघ्या 22 वर्षांची होती. यानंतर ती तिच्या नात्याबद्दल खूप चर्चेत आली होती. टीनाने दर दोन वर्षांनी तिच्या रिलेशनशीपबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. 2016 साली ती पहिल्यांदा प्रेमात पडली. नंतर 2018 मध्ये लग्न केलं. 2020 मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि आता 2022 मध्ये ती पुन्हा एकदा लग्न करणार आहे. यावेळी टीनाने आपला नवा जोडीदार निवडला आहे.
टीना ही मूळची मध्य प्रदेशची आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. टीनाने येथे पहिला क्रमांक पटकावला. यानंतर तिने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण समजली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेतही ती संपूर्ण देशातून पहिली आली होती. IAS च्या प्रशिक्षणादरम्यानच (2015 साली) तिची ओळख यूपीएससी परीक्षेत दुसरा आलेल्या अतहर आमिर खान याच्याशी झाली होती. तो मूळचा काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील आहे.
2016 मध्ये दोघेही दिल्लीत एका कार्यक्रमात भेटले होते. यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला. तेव्हा टीना म्हणाली होती, 'मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडलो होते.' त्यानंतर एका मुलाखतीत टीनाने सांगितले होते की, ती अतहरच्या बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाली होती. ती उघडपणे अतहरचे कौतुक करताना दिसत होती. हे सर्व जवळजवळ 2 वर्ष सुरु होतं.
टीना आणि अतहरचे 2018 साली लग्न झाले होते. या हायप्रोफाईल लग्नाची तेव्हा देखील खूप चर्चा झाली होती. मात्र 2 वर्षानंतर दोघांनी अचानक घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं समोर आलं होत. त्यांच्या या निर्णयाने अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण ही जोडी सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध होती. दोघेही एकमेकांबद्दल अनेक पोस्ट करायचे.
28 वर्षीय टीना डाबी ही आयएएस अधिकारी सध्या राजस्थानच्या वित्त विभागात सहसचिव आहेत. आता तिने आपल्या आयुष्यातील आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरची ती प्रदीप गावंडे या मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्याशी लग्नगाठ बांधणार आहे. ते 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप सध्या राजस्थानच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागात संचालक आहेत.
प्रदीप यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गावंडे प्रदीप केशोराव. आणि ते टीनापेक्षा जवळजवळ 13 वर्षांनी मोठे आहेत. प्रदीप यांनी नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून द्वितीय विभागात एमबीबीएस केले आहे. नंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. प्रशिक्षणानंतर त्यांना राजस्थान केडर मिळाले.
टीनाचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी झाला. टीनाने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात प्रथम श्रेणी विभागात पदवी घेतली आहे.