
मिथिलेश गुप्ता, टिटवाळा
माहेरी गेलेली पत्नी फोन उचलत नाही या नैराश्यातून डॉक्टर असलेल्या पतीने टिटवाळ्यातील राहत्या घरात 12 नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अकस्मात मुत्यूची नोंद करीत तपास सुरू केला होता. मात्र आता या प्रकरणी आत्महत्या केलेल्या डॉक्टरची पत्नी, सासू विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 32 वर्षीय डॉक्टरने 12 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती.
दरम्यान, आत्महत्येच्या आधी 12 नोव्हेंबरलाच संध्याकाळच्या सुमारास असं काही घडलं की, ज्यामुळे डॉक्टरने थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर पत्नी जी स्वत: सुद्धा डॉक्टर आहे ही दोन महिन्यापूर्वी बाळंतपणासाठी सातारा येथे गेली होती. दरम्यान, 12 नोव्हेंबरला संध्याकाळच्या सुमारास डॉक्टर आपल्या पत्नीस वांरवार फोन करीत होता. पंरतु पत्नी त्याचा फोन उचलत नव्हती. याच नैराश्यातून डॉक्टरने घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याच प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी जेव्हा आत्महत्या केलेल्या डॉक्टरचा मोबाइल तपासला तेव्हा त्यांना अत्यंत धक्कादायक माहिती समजली.
याच मोबाइलमध्ये पोलिसांना क्लिनिकच्या लेटर पॅडवर एक अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. ज्यामध्ये असं लिहलं होतं की, 'माझ्या पत्नीचे तिच्या मामेभावाशी अनैतिक सबंध असून माझी सासू तिला या सगळ्या प्रकारात पाठाशी घालत आहे.'
दरम्यान, अशी नोट मिळल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ आत्महत्या केलेल्या डॉक्टरची पत्नी आणि सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबतची माहिती टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली आहे.
'सासू-बायको व्हीडिओ कॉल करुन आमच्या मुलाला द्यायचे त्रास'
'माझ्या मुलाला त्याचे सासू, बायको मानसिक त्रास देत होते. मुलाची बायको आणि सासू व्हीडिओ कॉल करुन हे अनेकदा त्याला त्रास द्यायचे. या सगळ्या त्रासामुळेच त्याने आत्महत्या केली. त्याच्याकडे सुसाइड नोटही मिळाली आहे. आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी योग्य तपास करुन आम्हाला याबाबत न्याय द्यावा. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. डॉक्टरची सासू त्याची बायको आणि तिचा मामेभाऊ हे गुन्हेगार आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.' अशी मागणी डॉक्टरच्या आई-वडिलांनी केली आहे.