'सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं, काही लोक म्हणतील मीच बांधला'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना ठाकरी शैलीत सुनावले खडे बोल
'सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं, काही लोक म्हणतील मीच बांधला'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोघे एकाच मंचावर आज उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सिंधुदुर्गचा विकास मीच केला आहे हे जनतेला माहित आहे असं नारायण राणे म्हणाले होते त्याला उद्धव ठाकरेंनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे. सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय हे मान्य करू.. कुणीतरी म्हणेल मीच बांधला असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

एक काळ होता की मी एरियल फोटोग्राफी करत असे. त्यावेळी मी गड किल्ल्यांचे फोटो काढले होते. आता मला कुणीतरी ही माहिती द्या... सिंधुदुर्गचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे हे मान्य करू, कुणीतरी म्हणेल की मीच बांधला. असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना जोरदा टोला लगावला.

त्यामुळे या ठिकाणी विकास करण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. नीळंशार पाणी, कोकणची संस्कृती, अथांग सागर किनारा या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी इथे हेलिकॉप्टर फेरीही सुरू गेली पाहिजे असाही मानस उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. कोकणच्या विकासाच्या गरूडझेपेला आज सुरूवात झाली आहे. हे सगळं सुंदर सुरू आहे, नजर लागू नये म्हणून तीट लावतात ना तशीही काही लोकं व्यासपीठावर बसली आहेत. नारायण राणेंनी विकासासाठी अनेक गोष्टी केल्या, त्यांचे मी धन्यवाद देतो. मात्र नारायण राणेंनी जे सांगितलं ते देखील खरं आहे की बाळासाहेबांना खोटं बोललेलं खपत नव्हतं. जे खोटं बोलत होते, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या बाहेर हाकलून दिलं हा देखील इतिहास आहे त्यात मी फार काही पडत नाही. नाईलाजाने काही गोष्टी इथे बोलाव्या लागल्या. आजचा हा कार्यक्रम कोकणसाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सगळे मिळून आपण या कोकणचा विकास करू यात काही शंका नाही.

आजचा क्षण हा मला वाटतं आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचं मी खास अभिनंदन करतो आहे ते इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत. मातीत बाभळही उगवते आणि आंब्याची झाडंही उगवतात. यात मातीचा दोष नाही, माती म्हणणार मी काय करू? कोकण आणि शिवसेनेचं नातं काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. कोकणासमोर शिवसेना कायमच नतमस्तक झाली आहे असं म्हणत नारायण राणेंच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

पर्यटन म्हटलं की आपल्यासमोर गोवा राज्य येतं. कोकणचा विकास करू, कॅलफोर्निया करू अशा घोषणा अनेकांनी केल्या होत्या. मात्र हे साध्य झालं ते आमच्या सरकारच्या काळात हे विसरू नये. ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वतःहून बैठक बोलले. शिर्डीचा विमानतळ, चिपीचा विमानतळ, जळगाव, अमरावती याबद्दल ते प्रचंड तळमळीने बोलत होते. पोटातून तळमळीने बोलणं वेगळं असतं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं असंही म्हणत त्यांन पुन्हा एकदा नारायण राणे यांना लगावला.

रस्त्यावरचे खड्डे पडलेत आणि पाडले गेले आहेत ते बुजवण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलं पाहिजे. ज्योतिरादित्य शिंदेंनीही छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं. आपल्याला तोच अभिमान असला पाहिजे. नारायण राणेंकडे सूक्ष्म का होईना मध्यम का होईना पण मोठं खातं आहे. महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कोकणचं ऐश्वर्य जगात पसरलं आहेच. आता विमानाची सोय झाली आहे म्हटल्यावर पर्यटनासाठी जे जे काही करायचं आहे त्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं वचन मी सगळ्या कोकणवासीयांना देतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in