Advertisement

'ती ईडी आहे की, घरगडी'; मलिक-दाऊद प्रकरणावरून फडणवीस-मोदींना ठाकरेंचे 'फटकारे'

भाजप-देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उद्धव ठाकरेंचं विधानसभेत उत्तर
'ती ईडी आहे की, घरगडी'; मलिक-दाऊद प्रकरणावरून फडणवीस-मोदींना ठाकरेंचे 'फटकारे'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून सरकारवर टाकण्यात आलेले पेन ड्राईव्ह बॉम्ब आणि मलिकांच्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार हल्ला केला. मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी दाऊदचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस-मोदींच्या वर्मी बाण डागले. ईडीच्या कारवायांवरून प्रहार करत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले, "मी टिकेला आणि बदनामीला घाबरत नाही. मी कसा आहे हे लोकांना माहिती आहे, पण बदनामी कोणत्या थराला जाऊन करायची. नवाब मलिकांचा राजीनामा. जर दोषी असतील. संबंध असतील, बघूया काय करायचं. तुम्ही आरोप करायचे. तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू ते सत्य वाटायला लागतं. एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की, केंद्रीय तपास यंत्रणा एवढ्या पोकळ झाल्या आहेत की, नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबई आणि देशात सगळीकडे फिरतोय आणि चार-पाच वेळा निवडून येतोय. मंत्री बनतोय आणि केंद्रातील यंत्रणांना माहितीच नाही", असा घणाघात ठाकरेंनी केंद्रीय यंत्रणांवर केला.

"केंद्रातील यंत्रणा काय करतात, थाळ्या वाजवा. दिवे पेटवा. दिवे घालवा हे करतात का? दिवे लावतात, तर दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना कोणती माणसं दाऊदची आहेत. तिरंदाज लक्ष्यभेद करतो. आता काय होतंय केंद्रीय यंत्रणा तो बाण आहेत. त्यांना हातात पकडून लक्ष्यावर खुपसलं जातंय. हे तुझं लक्ष्य आणि सगळंच. देवेंद्र फडणवीसांना केंद्राने रॉ, सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे काम अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती तुम्ही ईडीकडे दिली. ईडीकडे इतके बेकार लोक आहेत का तिकडे", असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.

"माहिती देणारे तुम्हीच. आरोप करणारे तुम्हीच. चौकशी करणारे तुम्हीच. त्याप्रमाणे शिक्षाही हेच करतात. अशा केसेस तयार केल्यावर न्यायालय तरी काय करणार. सगळ्या यंत्रणा अशा राबवतात की, ती ईडी आहे की घरगडी आहे, हेच कळत नाहीये."

"मी अधिवेशनात अधूनमधून येत होतो. पूर्वी एक दाऊद शूज होते. तेही घोटाळ्यात गेला. पण त्याची एजन्सी कुणी घेतलीये का? हा दाऊद आहे कुठे? एखादा विषय निवडणुकीसाठी कितीकाळ घेणार आहात. इतकी वर्ष राम मंदिराचा विषय घेतला, आता यापुढे दाऊदचा घेणार आहात का? आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार आहात का? हे दाऊद कुठेय कुणाला माहितीये का?", असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

"गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होत की, दाऊदला फरफटत आणू. आता त्याच्यामागे फरफटत चाललो आहोत. त्याचे हस्तक शोधतोय. ओबामांनी ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? ओबामांनी निवडणुकीत त्याचा वापर केला होता. ओबामांनी कुणाची वाट नाही बघितली. पाकिस्तान ढगाआडून हेलिकॉप्टर पाठवायचे असा थिल्लरपणा नाही केला. त्यांनी जवान पाठवले आणि लादेनला घरात घुसून मारलं. याला म्हणतात मर्दपणा."

"जसं ओबामांनी ओसामाला मारलं, तर तुम्ही दाऊदला मारा. काहीही न करता नुसतं, आरोप करता. मी प्रामाणिकपणे सांगतोय की, आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधात आहोत. त्याबद्दल दुमत नाही. मलिकांचा राजीनामा मागत आहात. अफजल गुरूला फाशीला मेहबुबा मुफ्तींनी विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्ता स्थापन केली", असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in