'तुम्हाला सत्ता हवीय ना?, मी येतो तुमच्यासोबत'; उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान

केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर चढवला हल्ला
'तुम्हाला सत्ता हवीय ना?, मी येतो तुमच्यासोबत'; उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान

राज्यात ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचं सुरू असलेलं धाडसत्र आणि विरोधकांकडून मंत्र्यांवर आणि सरकारवर होत असलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून 'मातोश्री'च्या जवळ असलेल्या तसेच शिवसेनेच्या नेत्यावर सुरू असलेल्या कारवायांवरून ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी त्यांनी भाजपला थेट सत्तेची ऑफरच दिली.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "काही काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. धर की ठोक... धर की ठोक. हे बरोबर नाही. याने कुणाचंच काही होणार नाही. फक्त आरोप करून राज्य चालू शकत नाही. एखाद्याला तू वाईट आहे, सांगण्यासाठी तू किती चांगला आहे, हे लोकांना सांगावं द्यावं लागतं. दाखवून द्यावं लागतं. तेव्हा तो सांगेल की तू किती चांगला आहे. तू काही केलं नाही, असं म्हणायचं मग तुम्ही काय केलं ते सांगा. आता जे काही चाललं आहे. एकेक गोष्टी बोलून नंतर केल्या जातात. आधी हर्षवर्धन पाटील जे काँग्रेसमध्ये होते. त्यांना झोप लागत नव्हती, मग झोपेचं औषध घेतलं. (भाजपच्या आमदारांकडे हात दाखवत) तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव त्यांनी सभेत सांगितला. टीव्हीवर जाहिरात येते की, पहले मुझे नीद नहीं आती थी... असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे, मला कळत नाही", असं म्हणतात सभागृहात हशा पिकला.

'तुम्हाला सत्ता हवीय ना?, मी येतो तुमच्यासोबत'; उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान
'सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते', CM ठाकरेंचा थेट वार
"आम्ही इकडे बसलेलो आहोत. सगळे भ्रष्टाचारी आहोत. आम्ही सगळी दाऊदची माणसं आहोत, पण तुमचा सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता, तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही. आम्ही जर तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता, तर तुम्ही जी काय आमच्या कुटुंबांची बदनामी करता... ही अत्यंत नीच, निंदनीय आणि विकृत गोष्ट आहे. एकमेकांच्या कुटुंबांची बदनामी करणं", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या कारवायांवरून भाजपवर निशाणा साधला.

"मर्द आहात, तर मर्दासारखं या अंगावर. सत्तेचा दुरुपयोग करून यंत्रणाचा दुरुपयोग करता. म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे. शिखंडी कोण होता हे मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतंच नाही, शिखंडी कोण आणि मर्द कोण. कोण कुणाच्या आडून लढतंय? याला नामर्दपणा म्हणतात. या यंत्रणा वापरायच्या. कुटुंबियांना बदनाम करायचं. धाडी टाकायच्या. हे काय आहे."

'तुम्हाला सत्ता हवीय ना?, मी येतो तुमच्यासोबत'; उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान
'ती ईडी आहे की, घरगडी'; मलिक-दाऊद प्रकरणावरून फडणवीस-मोदींना ठाकरेंचे 'फटकारे'
"मागे नितीन गडकरी बोलले होते की आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. मग ईडीचं काम मनी लॉंडरिंग असतं, तुमच्या ह्युमन लॉंडरिंगचं काम आहे. बरबटलेला माणूस घ्यायचा. त्याला म्हैसूर सॅण्डल सोप आणि छान अत्तर लावून बघा कसा सुंदर झाला, हे ह्यमुन लॉंडरिंग तुम्ही सुरू केलं का?", असा मिश्कील टोला ठाकरेंनी भाजपला लगावला.

"हे जे होतंय ते कुणी बघत नाही, असं समजू नका. पोरांचे चाळे, थेर बघू न शकणारा धृतराष्ट्र होता, पण धृतराष्ट्र नाही. हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे. अशा वाटेला जाऊ नका. यातून कुणाचंच भलं होणार नाही. यातून काहीच होणार नाही. लोकांना आपण काय देणार आहोत? अनेकांची इथे येण्याची स्वप्न असतात. आपल्याला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करायचं की, माती हे ठरवायचं. काही सूचना असतील, तर सांगा. नवीन कल्पना असतील, तर सांगा. गुन्हेगार असेल, तर सांगा. उगाच बदनामी करू नका."

'तुम्हाला सत्ता हवीय ना?, मी येतो तुमच्यासोबत'; उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान
'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो.. असं नाही करायचं सुधीरभाऊ', मुख्यमंत्र्यांचा जोरदार टोला

"तुम्हाला सत्ता हवी ना, म्हणून तुम्ही हे ताणतणाव... कुटुंबियांना तणावात ठेवायचं. मग याला अटक करायचं, मग त्याला बेलच मिळू द्यायचा नाही. हे चाळे चाललेत ना. चला मी तुम्हाला या सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता हवीये ना... उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका. पेन ड्राईव्हचा खप उगाच वाढतो. ज्यांना हवा त्यांना मिळत नाही. त्यांचे त्यांना राहू द्या. मी म्हणतो मी तुमच्यासोबत येतो. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी नाही, तर तुम्ही आता जे चाळे केले आहेत. माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची. उगाच त्यांच्या मालमत्तांवर टाच... टाचेला मी घाबरत नाही. शाळेत मला छत्रपतींची कविता होती. खबरदार जर टाच मारूनी उडवेन चिंधड्या राई-राई एवढ्या. त्यामुळे टाचेला नाही घाबरत. मी तुमच्याबरोबर येतो. टाका मला तुरुंगात. माझ्यावरतीच यायचं ना... या ना मग, कुटुंबांची बदनामी कशाला करता. आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केलीये. तुमच्या कुटुंबियांच्या भानगडी असतील, आहेत असं म्हणणार नाही. आम्ही कधी काढण्याचा प्रयत्न केलाय कधी?", असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपला केला.

"मी तुमच्याबरोबर येतो. तु्म्ही तुरुंगात टाका, मग तुमच्या फुसरतीने आरोप गोळा करा. तेही करू नका. कारण त्याची गरज नाही. खुलासे करून उपयोग नाही. कुठे ऐकलंच जात नाहीये. काहीही सादर केलं की, नाकारल्या जातात. मग याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट याला. पुरावे गोळा केले जातात. न्यायालयासमोर नेले जातात. मग न्यायालय काय करणार, समोर आहे त्याप्रमाणे दे शिक्षा. तुमचा इतकाच जीव जळत असेल, तर टाका मला तुरुंगात. मी तयार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. तुरुंग कोणता? ऑर्थर रोड, तिहार नाही. जसं बाबरी मशिदीच्या खाली रामजन्मभूमी होती. त्याप्रमाणे कुठल्या जन्मभूमीचा शोध तुम्हाला लागला असेल, त्या तुरुंगात मला टाका", असं जाहीर आव्हान ठाकरेंनी फडणवीसांना दिलं.

"मी कृष्णाचा अवतार नाही. मी कदाचित देवकीच्या पहिल्या सात मुलांपैकी असेल, पण त्या तुरुंगात मी कृष्णजन्माची वाट बघेन. मी जसं सांगतो की, कृष्ण नाहीये, तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की, कसं नाही आहात. माझी तयारी आहे."
'तुम्हाला सत्ता हवीय ना?, मी येतो तुमच्यासोबत'; उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान
शिवसेनेला दुसरा धक्का... प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

"माझ्या कुटुंबियांनी काय पाप केली असतील... बाळासाहेबांना काय उत्तर देणार. मग मी तुम्हाला विचारतोय बाळासाहेबांनी ज्या तुमच्या नेत्यांना वाचवलं, ते तरी गेल्यानंतर काय उत्तर देणार? ज्यावेळेला त्यांच्यासोबत कुणी नव्हतं. सगळेजण ते नको म्हणत होते. तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्या मागे उभे राहिले. काय उत्तर देणार. २०१४ मध्ये युती तोडली, ती तुम्ही तोडली. तेव्हाही मी हिंदूच होतो. आजही तुम्हाला असं वाटतं की हिंदुत्वापासून फारकत घेतली, तर २०१४ साली हिंदूच होतो. आजही आहे."

"तुरुंगातून टाकणार असाल, तर सर्व जबाबदारी मी घेतो. माझ्या सर्व शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो. मला टाका तुरुंगात. १९९२-९३ साली जेव्हा सगळ्यांनी शेपट्या घातल्या होत्या, तेव्हा जिवावर उदार होऊन मुंबई वाचवली, त्या शिवसैनिकांना छळू नका. आम्ही ऐकतोय. हे यंत्रणांचे दलाल आहेत की, प्रवक्ते. हा तुरुंगात जाणार. अनिल देशमुख तुरूंगात जाणार, नवाब मलिक तुरुंगात जाणार. अनिल परब तुरुंगात जाणार. उद्या किशोरी पेडणेकरांना तुरुंगात टाकणार, हे काय आहे?", असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

"इंदिरा गांधींनी निदान आणीबाणी घोषित केली होती. अघोषित आणीबाणी इतक्या डरपोक त्या नव्हत्या. चांगली वाईट, पण त्यांनी घोषणा केली आणीबाणीची. ते धाडस त्यांनी दाखवलं. १९९२-९३ साली पोलिसांनी आणि लष्कराने हिंदूंना वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल परबांना गुरासारखं मारलेलं आहे. त्यांचं तुम्ही बांधकाम पाडता आहात. जे पाडायचं ते पाडा. पण सगळ्यांची पाडा, कुणालाही पदराखाली घ्यायचं नाही", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे राणेंवरही निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in