ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्लेंचं निधन, ‘रक्त आणि पाऊस’ सारखी अभिजात साहित्यकृती लिहिणारी लेखणी शांत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात निधन झालं. ते पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल होते. उपचारादरम्यानच आज त्यांचे निधन झाले . ते ७४ वर्षांचे होते.

१९६० नंतरच्या काळातील महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्‍या नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यासाठी अनुक्रमे डॉ.नांदापूरकर आणि कवीवर्य मायदेव हे प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार मिळाले. एम.ए (मराठी) परीक्षेत ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले.. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली.

१९७१ ते १९७७ या काळात बीड येथील महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम अधिव्याख्याता आणि नंतर प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले. १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) आणि साहित्य अकादमी (दिल्ली) ह्या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष (१९९५-१९९७), पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, धारवाड, बनारस हिंदू विद्यापीठ, म.स.वि.वडोदरा इत्यादी विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते.

ADVERTISEMENT

मराठवाडा साहित्य परिषदेचे (औरंगाबाद) कार्याध्यक्ष (१९८८-१९९५) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ह्या संस्थेचे २००१पासून उपाध्यक्ष, महाराष्ट्रातील अनेक नामांकित साहित्यिक आणि शैक्षणिक संस्थांचे सदस्य, पदाधिकारी, अध्यक्ष या नात्याने त्यांनी कार्य केले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

ADVERTISEMENT

‘मूड्स’ हा कवितासंग्रह; ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ हे कथासंग्रह; ‘राजधानी’ हा दीर्घकथांचा संग्रह; ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबर्‍या; ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित. याशिवाय ‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी), ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य), ‘जोतीपर्व’ आणि काही अनुवादित पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकर्‍यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ इत्यादी पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे.

कोत्तापल्ले यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. कोत्तापल्ले यांच्या साहित्यातून त्यांचे संवेदनशील, चिंतनशील, सामाजिक बांधीलकी मानणारे, परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व प्रकट होते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील मूल्य र्‍हासाच्या जाणिवेने व्यथित होणारे कोत्तापल्ले मूल्याधिष्ठित अशी पुरोगामी सामाजिक जाणीव प्रकट करणारे लेखन जसे करतात, तसेच व्यक्तिमनात निर्माण होणार्‍या सुखदु:खात्मक भावतरंगांचे उत्कट आणि हळुवार चित्रण करणारे लेखनही करतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतरांतून निर्माण झालेले प्रश्न आणि त्यांतून निर्माण होणार्‍या कधी सफल तर बहुतेक वेळा विफल ठरणार्‍या संघर्षांचे समर्थपणे केलेले वास्तवदर्शी चित्रण हा ही कोत्तापल्ले यांच्या कथात्मक लेखनाचा उल्लेखनीय विशेष आहे. सामाजिक वास्तवाचे सजग भान असणारा हा लेखक त्यामुळेच समकालीन समाजजीवनाचे अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारे प्रत्ययकारी चित्रण करण्यात यशस्वी ठरलेला आहे. कोत्तापल्ले यांच्या समीक्षा लेखनातही या सामाजिक जाणिवेतून केल्या जाणार्‍या विश्लेषणाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. प्रचलित परिभाषेत सांगावयाचे झाल्यास ‘साहित्यकृती कलात्मकतेचे भान ढळू न देता जीवनवादी भूमिकेतून समीक्षात्मक लेखन करणारा समीक्षक’ असे त्यांचे वर्णन करणे योग्य ठरेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT