Vidhan Parishad Election: भाजपने १३४ मतं नेमकी कशी मिळवली? कुणाची किती मतं फुटली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोमवारी दिवसभर विधान परिषद निवडणुकीचा धुरळा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीत भाजपने मैदान मारलं आहे. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे भाजपकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मतं नसतानाही एकूण १३४ मतं मिळवत भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र दोन्ही उमेदवारांपैकी चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आणि भाई जगताप जिंकले.

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी रणनीती या निवडणुकीसाठी कामाला आली यात काहीही शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले, शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची मतं फुटली. राज्यसभेच्या निवडणुकीत (RajyaSabha Election) भाजपला १२३ मतं मिळाली होती तर विधान परिषद निवडणुकीत भाजपला १३४ मतं मिळाली.

काँग्रेसची पहिल्या पसंतीची मतं हंडोरे यांना द्यायचं ठरलं असतानाही त्यांना पहिल्या फेरीत विजयी होता आलं नाही. पहिल्या फेरीत चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली तर भाई जगताप यांना २० मतं मिळाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुणाची किती मतं फुटली?

विधान परिषदेसाठी एकूण २८५ जणांनी मतदान केलं होतं. यामध्ये महाविकास आघाडीला १५१ मतं मिळाली. त्यात शिवसेनेला ५२, राष्ट्रवादी काँग्रेसला ५७ तर काँग्रेसला ४२ मतं मिळाली. तर भाजपला १३४ मतं मिळाली.

ADVERTISEMENT

शिवसेनेचं संख्याबळ अपक्ष वगळून ५५ असं आहे. शिवसेनेने दिलेले उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी या दोघांनाही प्रत्येकी २६ मतं मिळाली. त्यामुळे शिवसेनेची ३ मतं फुटली. काँग्रेसकडे ४४ आमदारांचं संख्याबळ आहे त्यात भाई जगताप यांना २० तर चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली. काँग्रेसला एकूण ४२ मतं मिळाली त्यामुळे काँग्रेसमधली दोन मतं फुटली.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ ५३ आहे. पण नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही तुरुंगात आहेत. त्यामुळे ही संख्या ५१ वर आली आहे. मात्र एकनाथ खडसे यांना २९ तर रामराजेंना २८ अशी एकूण ५७ मतं मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीला एकूण ६ मतं जास्तीची मिळाली.

भाजपकडे १०६ आमदारांचं बळ आहे. अशात भाजपच्या श्रीकांत भारतीय यांना ३०, राम शिंदे यांना ३०, प्रवीण दरेकर यांना २९, उमा खापरे यांना २७ आणि प्रसाद लाड यांना १७ मतं मिळाली. भाजपला एकूण १३४ मतं मिळाली आहेत. त्यामुळे संख्याबळापेक्षा २७ मतं भाजपला जास्त मिळाली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही बेरजेचं राजकारण केलं होतं. तसंच राजकारण यावेळीही केलं. त्यामुळेच महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे ?

विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच या निवडणुकीत पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

माझे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई टिळक हे दोघेही अडचणीत असून, आजारी असून या ठिकाणी आले त्यांचे मी विशेष मी आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीतल्या विजयामुळे परिवर्तानाची नांदी आता पाहण्यास मिळते आहे. सरकारच्या विरोधातला असंतोष समोर आला आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT