
राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीत चार जागांवरील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. चारही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपत एकमत झाल्यानं बिनविरोध निवडणूक होत असल्याचंच दिसून येत असून, अकोला आणि नागपूर येथे मात्र फाईट बघायला मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांवर कोण जिंकणार हा सस्पेन्स कायम आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यात काही ठिकाणी महाविकास आघाडी (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) आणि भाजपमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यात यश आल्याचं दिसत आहे.
मुंबईत दोन्हीही जागा बिनविरोध
मुंबईतील दोनपैकी एका जागेवर भाजपनं राजहंस सिंह यांना, तर दुसऱ्या जागेवर शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं दोघेही बिनविरोध विधान परिषदेत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
कोल्हापुरात महाडिकांकडून तलवार म्यान... धुळ्यात अमरिश पटेल...
कोल्हापुरात राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या अमल महाडिकांसह, शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र, काँग्रेस आणि भाजपत बिनविरोध करण्यावर एकमत झालं. धुळे-नंदूरबारमधून काँग्रेसने माघार घेण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजपने अमल महाडिकांचा अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली. धनंजय महाडिकांच्या सूचनेुनसार अमल महाडिक आणि शौमिका महाडिकांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
कोल्हापूरबरोबरच धुळे-नंदूरबारमध्येही भाजपच्या अमरिश पटेल यांच्या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इथे काँग्रेसने गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती. कोल्हापूरच्या बदल्यात काँग्रेसने धुळे-नंदूरबारमधून माघार घेतली.
नागपूर आणि अकोल्यात होणार फाईट...
नागपूरमधील निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्नात दोन्हीकडून राजकीय पक्षांना यश आलं नाही. त्यामुळे आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे निश्चित झालं आहे. काँग्रेसकडून भोयर यांचा विजयाचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुसरीकडे अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेनं गोपीकिशन बजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने वसंत खंडेलवाल यांना मैदानात उतरवलेलं आहे. विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही महत्त्वाची आहे. दोन्ही पक्षांकडून वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अकोल्यातून कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सगळ्यांच्याच नजरा असणार आहे.