'आमच्यावर दबाव न टाकता अधिवेशनात आवाज उठवा', ST कर्मचाऱ्यांनी शिवसेना आमदाराला सुनावलं

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि ST कर्मचाऱ्यांमध्ये कलगीतुरा
'आमच्यावर दबाव न टाकता अधिवेशनात आवाज उठवा', ST कर्मचाऱ्यांनी शिवसेना आमदाराला सुनावलं
आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध जळगावात एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शन

- मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी

राज्यातील एसटी कामगारांच्या संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका संघटनेने संपातून माघार घेतली असली तरीही बहुसंख्य कामगार हे विलीनीकरणाच्या मागणीवर अजुनही ठाम आहेत. एकीकडे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बससेवा सुरु झाली नाही तर मी स्वतः बस चालवून संप मोडेन अशी घोषणा केली होती.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध करत जळगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आमच्यावर दबाव न टाकता अधिवेशनात आवाज उठवा अशा शब्दांत सुनावलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बुधवारी सकाळी मिनीट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षेचा अपघात होऊन तीन जणं जागीच ठार झाले. या अपघातात १० जणं गंभीररित्या जखमीही झाले. या अपघातस्थळी भेट देताना मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एसटीचा संप सुरु असल्यामुळे नागरिकांना अशा पद्धतीने अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो आहे असं वक्तव्य केलं. जामनेरचा हा अपघात यामुळेच झाल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी एसटी कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध जळगावात एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शन
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट! अजय गुजर प्रणित संघटनेची संप मागे घेतल्याची घोषणा

दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा आज जळगावात एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध केला. "प्रवाशांना वेठीस धरणं आम्हाला आवडत नाही, प्रवासी आहेत म्हणून आम्ही आहोत याची आम्हाला जाणीव आहे. विलीनीकरण ही आमची एकमेव मागणी आहे. सरकारने ती मान्य करावी आम्ही संप मागे घेतो", अशा शब्दांत एका महिला कर्मचाऱ्याने आपली बाजू मांडली. याचसोबत आमच्यावर अशा पद्धतीने आरोप करणं चुकीचं आहे. चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर दबाव न टाकता विधानसभेत यावर आवाज उठवावा अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.

राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी एसटीचा संप मोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढ जाहीर केली. याचसोबत कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लावण्याची धमकी दिल्यानंतरही संघटना संपावर ठाम असल्यामुळे हा प्रश्न सरकार कसा सोडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध जळगावात एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शन
संप संपवा, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका! एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांची कळकळची विनंती

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in