Exclusive : चौकशीला हजर राहण्यापूर्वी नेमकं काय म्हणाले परमबीर सिंग?

231 दिवसांनी परमबीर सिंग मुंबईत दाखल, तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन
Exclusive : चौकशीला हजर राहण्यापूर्वी नेमकं काय म्हणाले परमबीर सिंग?

मी तपासाला सहकार्य करण्यासाठीच मुंबईत दाखल झालो आहे. मला जे म्हणायचं आहे ते मी कोर्टात स्पष्ट करणार आहे. मला न्याय मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. परमबीर सिंग यांनी मुंबईत पोहचल्यानंतर तपासाला हजर राहण्यापूर्वी मुंबई तकला ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेचे सिनीयर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी परमबीर सिंग यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीर सिंग
परमबीर सिंग(फाइल फोटो)

परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपये दर महिन्याला वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. तसंच अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या यामध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. अँटेलिया प्रकरण समोर आल्यानंतर आणि त्यातला सचिन वाझेचा सहभाग आणि इतर सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने समोर आणल्या. ज्यानंतर त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांना डी.जी. होमगार्ड हे पद दिलं.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

यानंतर 20 मार्चला परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट हा त्यातला मुख्य आरोप होता. हे प्रकरण जेव्हा बॉम्बे हायकोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपद सोडलं. त्यानंतर विविध घडामोडी घडल्या. आयटी, ईडी आणि सीबीआय यांचे छापे अनिल देशमुख यांच्या घरी, कार्यालयांवर पडत होते. दुसरीकडे चांदिवाल कमिशनकडून या प्रकरणी परमबीर सिंग यांनीही चौकशीसाठी हजर रहावं हे सांगितलं गेलं होतं.

मात्र चौकशीसाठी अनिल देशमुखही समोर येत नव्हते आणि परमबीर सिंगही पुढे येत नव्हते. १ नोव्हेंबरला अनिल देशमुख हे समोर आले, इडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांना मनी लाँड्रीग संबंधी प्रश्न विचारत त्यांची चौकशी करत रात्री उशिरा अटक करण्यात आली. दुसरीकडे परमबीर सिंग यांचा शोध सुरूच होता. या दरम्यान जो कालावधी गेला तो लक्षात घेऊन सरकारने परमबीर सिंग देशाबाहेर पळाले आहेत असंही कोर्टाला सांगितलं.

अशा सगळ्या परिस्थितीत परमबीर सिंग यांचं एक प्रतिज्ञापत्रही समोर आलं. ज्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोडलं तर आपल्याकडे अनिल देशमुखांच्या विरोधात काहीही पुरावे नाहीत. आता मीडियासमोर परमबीर सिंग आज आले आहेत. ते आता काय करणार? आपल्या विरोधात झालेल्या पाच तक्रारींना कसं उत्तर देणार हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in