
मुंबई: 'लाऊड स्पीकरसाठीची वेळ, डेसिबलची मर्यादा या सगळ्याच्याच आधारे आजपर्यंत राज्यात लाऊड स्पीकरचा वापर करण्यात येतो. गेल्या काही दिवसात लाऊड स्पीकरच्या वापरासंदर्भात अमूक तारखेपर्यंत भोंगे उतरले नाहीतर आम्ही उतरवू किंवा हनुमान चालीसा म्हणू वैगरे-वैगरे... कायद्यात सरकारने भोंगे लावणे किंवा उतरवणं अशी कोणतीही तरतूद नाही. सरकार त्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करत आहेत त्यांनीच त्या ठिकाणी काय काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे.' असं म्हणत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं की, भोंग्यावर सरसकट बंदी घालता येणार नाही. आज भोंग्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत गृहमंत्री बोलत होते.
'सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे बंद करता येणार नाहीत फक्त आवाजाची मर्यादा पाळावी लागेल. कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांसाठी, समाजासाठी वेगळी भूमिका घेता येणार नाही. सगळ्यांसाठी समान भूमिका घ्यावी लागेल.' असंही वळसे-पाटील यावेळी म्हणाले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले?
'भोंग्यासंदर्भात मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. सध्या ज्या गाईडसलाईन्स आहेत त्या पुरेशा आहेत किंवा त्यामध्ये काही नव्याने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का? हे पाहिलं जाईल. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर पोलीस कारवाई करेल.'
'जी आता परवानगी आहे सुप्रीम कोर्टाची सकाळी सहा वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या दरम्यान भोंगे वापरायला सरकारने बंदी घातली आहे. परवानगी देताना आवाजाची मर्यादा घालून दिली आहे वेगवेगळ्या झोनमध्ये.' असं वळसे-पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यात भोंग्यावरुन जो काही वाद सुरू आहे. त्यावरुन राज्यात कोणताही जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावा यासाठी गृहमंत्र्यांनी भोंग्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. पण या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली.
सर्वपक्षीय बैठकीचं का करण्यात आलं आयोजन?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरुन भोंगे हटवावे अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू. असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ठाण्यातील उत्तर याच गोष्टीचा उच्चार केला. एवढंच नव्हे तर त्यांनी 3 मेपर्यंत अल्टिमेटम देखील दिला आहे.
या सगळ्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरणं बरंच तापलं आहे. राज ठाकरे हे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे आता भाजप देखील हाच मुद्दा करुन पुढे सरसावले आहेत.
3 मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. तोवर आपण मुदत देतो. तोपर्यंत जर भोंगे हटले नाही तर आपण दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरे म्हणाले होते. याच सगळ्या वक्तव्यांचा विचार करता राज्य सरकारने देखील कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे.