
नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा हिसेंच्या झळा बसल्या आहेत. अमरावतीतील अचलपूर-परतवाडा या दोन शहरांमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. सध्या दोन्ही शहरांत तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे.
हिंसाचार अचानक घडला का?
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून म्हणजे हनुमान जयंतीपासूनच काही तणाव वाढवणाऱ्या घटना घडत होत्या. त्यातच रविवारी (१७ एप्रिल) सायंकाळी पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या दुल्हा गेट गेटवर अनधिकृतपणे झेंडा लावण्यात आला होता.
या झेंड्याला एका समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला आणि नंतर झेंडा काढून टाकला. झेंडा काढल्यानंतर वादाची ठिणगी पडली. वाद विकोपाला जाऊन दोन्ही समाज एकमेकांसमोर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.
संतप्त झालेल्या जमावाला पोलिसांनी बळाचा वापर करत पांगवण्याचे प्रयत्न केले. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीपासूनच परतवाडा आणि अचलपूर शहरात संचारबंदी लागू केली. आजही दोन्ही शहरांत तणावपूर्ण वातावरण आहे.
हिंसाचारानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. अमरावती ग्रामीण आणि अकोल्यातून अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आलं. तीन ठिकाणी झालेल्या घटनेत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत जवळपास शंभर ते दीडशे जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी ग्रामीण गुन्हे शाखेच्या तीन व स्थानिक पोलीस स्टेशनच्या दोन अशी पाच पथकं तयार करण्यात आली आहेत. या आरोपींना सीसीटीव्ही, व्हॉट्सअप, इतर सोशल मीडियावरील व्हिडीओच्या आधारे अटक करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर अमरावतीमध्ये भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि काही कार्यकर्ते याठिकाणी भेट द्यायला गेले होते. त्यांना शहरात प्रवेश करण्याआधीच चांदुर बाजार नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
एसआरपीएफच्या तीन कंपन्या, अमरावती व अकोला येथील १०० पोलीस कर्मचारी व अधिकारी अचलपूर येथे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी ही माहिती दिली.