
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख हा चढताच आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होते आहे. अशात राज्यात, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार का? असाही प्रश्न चर्चिला जातो आहे. परिस्थिती आटोक्यात येऊ शकली नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावाच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई तकने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत विचारलं त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट कधी आटोक्यात येईल? असा प्रश्न मुंबई तकने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे. 'आरोग्यविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही लाट येऊन ५० दिवस झाले आहेत. येत्या ३० ते ३५ दिवसांमध्ये ही लाट आटोक्यात येईल' असं इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यावर लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे का? असं विचारण्यात आलं तेव्हा चहल म्हणाले, 'कोणतेही साथीचे रोग असो त्यामध्ये तीन केंद्रबिंदू असतात. पहिला म्हणजे आपला मृत्यूदर कमी असला पाहिजे. WHO चं म्हणणं आहे की, मृत्यूदर हा 8 टक्क्यांच्या खाली हवा. आता मागील 50 दिवसात आपण 0.2 एवढा मृत्यूदर ठेवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना बेडची गरज आहे त्यांना बेड मिळाला पाहिजे. सध्या बेडची जी मागणी आहे त्यापेक्षा आमचा पुरवठा जास्त आहे. बेड भरले तरी आम्ही अधिक बेड वाढवत जाणार. मागच्या वर्षी आपण जे जम्बो हॉस्पिटल सुरु केले त्याचा खूप फायदा होत आहे.
देशात मुंबई हे एकच असं शहर आहे जिथे ९ जम्बो हॉस्पिटल आहेत. हे सगळे हॉस्पिटल आहेत कोव्हिड सेंटर नाहीत. इथे आयसीयू आहेत, डायलिसिस बेड आहेत. 70 टक्के ऑक्सिजन बेड आहेत. म्हणून यामुळे आमची मुंबई आरोग्य सेवा एवढी भक्कम आहे की, दररोज 10 ते 12 हजार कोरोना रुग्ण सापडले तरीही आम्ही परिस्थिती हाताळू शकतो.
तिसरा मुद्दा म्हणजे आपला जो पॉझिटिव्हीटी रेट आहे तो कमी ठेवला पाहिजे. आता जो नवा म्यूटन व्हायरस आहे तो खूपच वेगाने पसरतो. म्हणजे घरात एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाली तर घरातील इतर लोकांना देखील लागण होण्याची शक्यता असते. आधी असं होत नव्हतं. त्यामुळे आपला पॉझिटिव्हीटी रेट वाढलाय. पण लक्षणं नसलेले रुग्ण आपल्याकडे अधिक आहेत.'