'जरंडेश्वरची मालकी कुणाची हे अजित पवारांनी सांगावं' आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोमय्या आक्रमक

अजित पवारांनी हे सांगावं की जरंडेश्वर कारखाना नेमका कुणाच्या मालकीचा आहे?
'जरंडेश्वरची मालकी कुणाची हे अजित पवारांनी सांगावं' आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोमय्या आक्रमक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, अंबलिक शुगर, पुष्पदंतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. दरम्यान या कारवाईवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माध्यमांमुळे हे आयकर विभागाची धाड सुरु असल्याचे मला कळले आहे. या धाडी कशा संदर्भात सुरु आहेत हे अजित पवारच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तुम्ही पाप केले आहे, तुम्ही घोटाळे केले आहेत तर ते मान्य करा. अजित पवारच नव्हे तर देशातील कुठल्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये अशी आमची पण भूमिका आहे. मी कालही जरंडेश्वर येथे गेलो होतो. अजित पवारही काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आले आहेत. मग पवार साहेब जरंडेश्वरचा खरा मालक कोण? याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

अजित पवार
अजित पवार फोटो सौजन्य - ट्विटर

सुरुवातीपासून जरंडेश्वरच्या नशिबात संघर्ष -

डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भाग-भांडवल उभारत चिमणगावच्या माळावर साखर कारखाना उभा केला होता. कारखान्याच्या मंजुरीपासून लिलाव प्रक्रियेपर्यंत त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज देण्यास नकारघंटा वाजवल्याने त्यांनी राज्यातील इतर बँकांकडून कर्ज घेत कारखान्याची उभारणी केली. मात्र पहिल्याच गळीत हंगामापासून कारखाना विविध कारणांनी अडचणीत येत गेला.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी... कारखान्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नव्हती. कारखान्यातील कामगारांसह अन्य जवळच्या लोकांच्या नावावर विविध वित्तीय संस्थांकडून कर्जे उचलल्याने दरवर्षी कारखान्याची आर्थिक घडी विस्कळीत होत गेली. त्यातच कारखान्यातील कामगारांनी संघटना स्थापन केली, रायगड जिल्ह्यातील एका कामगार नेत्याने कारखान्यासाठी आंदोलन उभे केले आणि त्यातून कारखान्याचे दिवस फिरले. पश्‍चिम महाराष्ट्रात दोन व्हाईसचेअरमन असलेला हा एकमेव सहकारी साखर ठरला.

असा राहिला आहे कारखान्याचा आतापर्यंतचा इतिहास -

२१ नोव्हेंबर १९८९ साली नोंदणी

१९९९ मध्ये पहिला गळीत हंगाम

२००५ पर्यंत शालिनीताई पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता

२००५ ते २०१० या काळात कारखाना भाडेतत्वावर

जून २०१० मध्ये राज्य बँकेने कारखाना ताब्यात घेतला, ऑगस्टमध्ये नोटीस काढून डिसेंबर २०१० मध्ये जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव झाला.

अनेकांनी कारखाना भाडेतत्वावर चालवण्याचा प्रयत्न केला, पण...

आर्थिक आरिष्टात सापडल्यानंतर कारखाना चालवणे अवघड झाल्याने कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील मोठे साखर उद्योजक झुनझुनवाला यांनी काही काळ कारखाना चालविला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सहकारातील सर्वात मोठ्या वारणा समुहाने काही काळ कारखाना चालविला, मात्र संचालक मंडळासह कामगारांच्या कुरबुरीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यांच्यानंतर सिध्दार्थ समुहाने काही काळ कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील मधूनच व्यवस्थापन सोडून निघून गेले. अखेरीस राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी कारखान्याचा लिलाव केला, या लिलाव प्रक्रियेमध्ये भुईंजच्या किसनवीर साखर कारखान्याने सुरुवातीला भाग घेतला, मात्र त्यांनी ऐनवेळीस माघार घेतली. त्यानंतर मुंबईस्थित गुरु कमोडिटीज कंपनीने कारखाना लिलावात विकत घेतला.

Related Stories

No stories found.