
तुमचा मोबाईल-कॉम्प्युटरवरील इंटरनेट ज्या सुपरफास्ट स्पीडने चालणारे आहे ते आहे 5G, पण ह्याच 5G विमानांची उड्डाणं रद्द करण्याची वेळ आली आहे. भारतातली एअरलाईन कंपनी एअर इंडियाने ट्विट करून माहिती दिली की 5G मुळे अमेरिकेत जाणाऱ्या विमानसेवा ते सुरू ठेऊ शकत नाहीयेत, त्यामुळे 19 जानेवारीच्या फ्लाईट्स या रद्द झाल्या. केवळ भारतच नाही तर ब्रिटिश एअरवेज, सिंगापूर, कोरिया, जपान या देशांनीही एक तर फ्लाईट्स रद्द केल्यात, किंवा त्यांचे मार्ग बदलले आहेत. पण 5G चा आणि विमानसेवांचा काय संबंध? 5G मुळे विमानांच्या उड्डाणात नेमके काय अडथळे येत आहेत, हेच आज समजून घेऊयात.
सगळ्यात आधी 5G हे काय आहे, ते जाणून घ्या.
5G ब्रॉडबँड सेल्युलर नेटवर्कचं सगळ्यात फास्ट तंत्रज्ञान आहे. 5G म्हणजेच फिफ्थ जनरेशन. 1980 मध्ये 1G टेक्नॉलॉजी आली होती, तेव्हा स्पीड हा फक्त 2,4 Kbps एवढाच मिळायचा. त्यानंतर 1991 मध्ये 2G आलं, ज्यामुळे 64 kbps एवढा स्पीड मिळू लागला. 2000 मध्ये 3G आलं. 3G मुळे व्हीडिओ कॉलिंग, ई-मेल, फाईल्स पाठवायला सुरूवात झाली. 3G आल्यानंतर वेगवेगळे डेटा प्लॅन्सही यायला लागले. 2011 मध्ये 4G टेक्नॉलॉजी आली, ज्याने स्पीड आणखीन वाढला आणि त्यामुळे स्मार्टफोनचा खऱ्या अर्थाने वापर करणं लोकांना शक्य झालं. आता येणार आहे ते 5G, ज्यामुळे 1Gbps हून अधिक स्पीड मिळेल.
5G तंत्रज्ञानामुळे केवळ नेटफ्लिक्स आणि गेमिंगसाठी फोनचा स्पीड वाढणार, एवढ्यावरच सगळ्या गोष्टी मर्यादित नसतील. तर हेल्थकेअर, व्हर्च्युअल रिअॅलिटी, क्लाऊड गेमिंग यासाठी नवीन मार्ग उघडतील. ड्रायव्हरलेस कारचं स्वप्नही प्रत्यक्षात उतरू शकतं.
मोबाईल्समधील तंत्रज्ञानात वापरणाऱ्यात येणाऱ्या Electro-magnetic waves म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरींमुळे कॅन्सर होण्याची किंवा आपली इम्युन सिस्टीम कमकुवत करण्याची भीती व्यक्त केली जाते. हायस्पीड नेटवर्क द्यायचं म्हटल्यावर या लहरी मोठ्या प्रमाणावर असतील, आणि म्हणून 5G मुळे आरोग्याच्या समस्याही भेडसावतील, असं म्हटलं जातंय. हाच मुद्दा घेऊन अभिनेत्री जुही चावलानेही सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली.
पण प्रश्न आहे की विमान कंपन्यांचा 5G वर काय आक्षेप आहे? का विमानांची उड्डाणं 5G मुळे रद्द होत आहेत?
अमेरिकामध्ये 5G सर्व्हिसेसला सुरूवात झाली आहे, पण यामुळे अनेक एअरक्राफ्ट उड्डाणं घेण्यालायक राहणार नाहीत, अमेरिकेच्या Federal Aviation Administration नेही याबाबत आधीच इशारा दिला होता. 5G मुळे विमानाचं रेडिओ अल्टिमिटर इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टिमवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
आता 5G चा स्पीडही जास्त मिळवण्यासाठी अमेरिकेने 5G फ्रिक्वेन्सींचा लिलाव केला आणि कंपन्यांना C band वरील ३.७ ते ३.९८ गिगाहर्ट्झ या स्तरावरील फ्रीक्वेन्सी दिल्या.
अमेरिकेत 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी ३.७ ते ३.९८ गिगाहर्ट्झ हा जो C-band आहे त्याचा लिलाव करण्यात आला 80 बिलियन डॉलरला मोबाईल कंपन्यांना करण्यात आला, जेणेकरून तो फास्टेस्ट स्पीड देऊ शकतील. जितकी जास्त फ्रीक्वेन्सी, तितका जास्त स्पीड मिळतो. आता हा जो C-band आहे त्यामुळेच विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होणार आहे.
विमान हवेत उडत असताना त्याचे जमिनीपासूनचे अंतर मोजणारे ‘अल्टीमीटर’ हे उपकरण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. विमानाची दिशा बदलण्यासाठी, ते उतरवण्यासाठी या उपकरणाचा आधार घ्यावा लागतो. हे उपकरण हवेतील ४.२ ते ४.४ गिगाहर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीत कार्यरत असतं. म्हणजेच ज्या बँडमध्ये या अल्टीमीटर च्या फ्रीक्वेन्सी आहेत, त्याच बँडमध्ये 5G च्या फ्रीक्वेन्सीही आहेत, त्यामुळेच हा खूप मोठा अडथळा मानला जातोय.
US च्या ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’चही हेच म्हणणं आहे की या फ्रीक्वेन्सी आणि 5G च्या सी बॅण्डच्या फ्रीक्वेन्सी यांतील अंतर फारच कमी असल्यामुळे ५ जी लहरी अल्टीमीटरच्या कार्यात अडथळे निर्माण करू शकतात. तसं झाल्यास विमान वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. स्वयंचलित पद्धतीने म्हणजेच विमानाचं ऑटोमॅटिक लँडिंगच्या प्रक्रियेतही या फ्रिक्वेन्सी अडथळा आणू शकतात. याशिवाय खराब हवामानाची स्थिती असल्यास हा धोका वाढू शकतो, असेही मानलं जातंय.
टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं काय?
अमेरिकेच्या टेलिकॉम कंपन्यांनी म्हटलंय, 4 हून अधिक देशांमध्ये 5G कार्यान्वित झाली आहे. मात्र, त्याचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. पण तूर्तास या कंपन्यांनी विमानतळांच्या परिसरात 5G सेवा कार्यान्वित न करण्याचंही जाहीर केलं आहे.
भारतातील स्थिती काय?
केंद्र सरकारने 2022 मध्ये देशातील महत्त्वाच्या शहरांत 5G सेवा सुरू करण्याचं जाहीर केलं आहे. यात मुंबई, दिल्ली, बंगळूरू, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, लखनऊ इ. शहरांचा समावेश आहे. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी यासाठी तयारीही सुरू केली आहे. यासाठीच्या स्पेक्ट्रमचा लिलाव जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.