
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा चर्चेत आणल्यापासून, सध्या राजकीय वर्तुळात भाजप-मनसे युतीच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चांना आता खुद्द भाजप आमदाराने बळ दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत पाणी प्रश्नावरुन मनसे आणि भाजप एकत्र आल्याचं पहायला मिळालं. यानंतर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये संघर्षाची वेळ आली तर पुन्हा एकत्र येऊ असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीमधील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बिकट समस्येवर भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील एकत्र आले होते. या दोन आमदारांच्या एकत्र येण्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. यानंतर भाजप आमदार रविंद्र चव्हाणांच्या फेसबूक पोस्टमुळे आता मनसे-भाजप युतीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे.
काय म्हणाले आहेत रविंद्र चव्हाण आपल्या फेसबूक पोस्टमध्ये?
संघर्षाचे समाजकारण करावे लागले तर पुन्हा एकत्र येऊ..... कालचा तहान मोर्चा म्हणजे एक प्रकारे ठाकरे सरकारच्या मुर्दाड प्रशासनाविरुद्ध लोकांनी केलेला उत्स्फूर्त प्रतिकार होता. नागरी वस्तीत राहणाऱ्या लोकांना सरकारकडून आणि प्रशासनाकडून बेसिक अपेक्षा असतात. नागरी सुविधा. एकही नागरी सुविधा धड मिळत नाही आणि पाण्याची तर समस्या दिवसेंदिवस उग्र बनतीये. अजून अख्खा मे महिना जायचा आहे. हे गेले अनेक महिने सुरु आहे. घोटाळेबाज सरकार आणि एसीत बसून खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकातोंडात पाणी आणल्याशिवाय आता जनता गप्प बसणार नाही. भारतीय जनता पार्टी या नावातच अवघा भारत आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावातच अवघा महाराष्ट्र आहे. देशाच्या आणि राज्याच्या जनतेला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांसाठी संघर्षाचे समाजकारण करावे लागले तर पुन्हा एकत्र येऊ ही खात्री देतो.... भाजपा 🤝 मनसे जय हिंद...जय महाराष्ट्र !!!
आतापर्यंत मराठी भाषेचा मुद्दा घेतलेल्या मनसेने आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर भाजप शिवसेनेला मनसेच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राज्यभर रंगत आहे. आपल्या भाषणांमधून महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढणारे राज ठाकरे सध्या भाजपविरुद्धही नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच पाणीप्रश्नावरुन कल्याण-डोंबिवलीत एकत्र आलेले भाजप-मनसे भविष्यकाळात राज्याच्या राजकारणातही एकत्र दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.