...त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं भाष्य

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून वेगाने रुग्णवाढ होत असून, या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला...
आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे फोटो-इंडिया टुडे

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तसंच ओमिक्रॉन रूग्णांमध्येही वाढ होते आहे. अशात राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. यासंदर्भात राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राजेश टोपे काय म्हणाले?

'आम्ही आधी देखील म्हणालो आहोत, लॉकडाउन… लॉकडाउन… असं जरी कोणी म्हणत असेल तरी तो आत्ता नाहीच. सध्या अजिबात तो विषय नाही. कारण, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची कुठेही चर्चा नाही. निर्बंध जरूर वाढवले पाहिजे आणि लॉकडाउनची भाषा आम्ही त्याचवेळी केली की, ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल. अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाउनचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढतेय हे मात्र तेवढच खरं आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले राजेश टोपे?

लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो. लोकांनी पहिल्या दुसऱ्या लॉकडाउनची झळ सोसलेली आहे. निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याच काम सुरू झालेलं आहे. बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील.

रूग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे निर्बंध लागू केलेले आहेत. त्याची कठोर पद्धतीने अंमलबजाणी करणे हा एक शासनासमोरचा आव्हानात्मक विषय नक्कीच आहे. त्यामुळे कोविड अनुषंगिक वर्तवणुक असो किंवा मग आता जे काही निर्बंध लागू केलेले आहेत, ते सगळे लागू करण्याचा विषय. संक्रमण होऊ नये किंवा संसर्ग वाढू नये या दृष्टीकोनातून उपाय करणं हे शासनाचं प्रथम प्राधान्य आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यात दोन दिवसात कोरोनाचे रूग्ण दुप्पट होत आहेत. आजही राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ही 12 ते 15 हजारांच्या घरात जाऊ शकतो असा अंदाज आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या संसर्गाचं प्रमाण अधिक असू नये एवढंच काळजीची गोष्ट आहे. कारण यात मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे डेल्टा आणि ओमिक्रॉनचे रूग्ण यांच्यातील प्रमाण कळणं आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in