
मुंबई तक: तौक्तेनंतर भारतात यास हे वादळ येणार आहे. या वादळामुळे महाराष्ट्रात फारस नुकसान होणार नसलं तर मान्सूनची तारीख अलिकडे येऊ शकते. तसंच महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यास हे वादळ बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगाल आणि ओडीसामध्ये धडकणार आहे. ओडीसामधल्या 12 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 25 ते 26 मे दरम्यान हे वादळ सक्रीय असेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याच दरम्यान मान्सूनसाठीची आवश्यक प्रक्रिया बंगालच्या उपसागरामध्ये सुरू असल्याने याचा मान्सूनवर काही परिणाम होईल का असा प्रश्न विचारण्यात येतोय. यावर आयएमडीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर.के. जेनमणी यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया दिलीय. त्यात त्यांनी “बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्याच्यावर या वादळाचा फार परिणाम होणार नसल्याची माहिती दिली. तसंच जर काही परिणाम झाला तर मान्सून काही दिवस आधीच भारतात येऊ शकेल” अशी माहिती दिली आहे. याआधी मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
महाराष्ट्रात या वादळादरम्यान फारसा परिणाम होणार नाही. मात्र राज्यात वादळामुळे काही ठिकाणी आणि किनारपट्टी प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, मुंबईतलं वातावरण ढगाळ असेल अशी माहिती हवामान खात्यातील अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली आहे.
25 ते 26 मे ला हे वादळ सक्रीय असेल आणि 27 मे ला या वादळाचा प्रभाव पूर्ण ओसरेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
वादळाबद्दल थोडक्यात माहिती
22 मे पर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ किती गंभीर स्वरुपाचं असेल हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दरम्यान, पूर्व किनारपट्टीवर बर्याच राज्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 25-26 मे रोजी 'यास' हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून ओडिसा आणि प. बंगालच्या काही भागात धडकणार असल्याची माहिती आहे. 25 आणि 26 मे ला सक्रीय असेल.