'बलात्कार पीडितेशी लग्न करणार का?' कोर्टाचा जळगावच्या आरोपीला सवाल

2014-15 साली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाने पीडितसोबत लग्न करणार का? असा सवाल विचारला आहे.
सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात काल (सोमवार) एका बलात्कार प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. याचवेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आरोपीच्या वकिलाला अशी विचारणा केली आहे की, 'बलात्कार केलेल्या मुलीसोबत आरोपी लग्न करणार का?' आरोपी हा महाराष्ट्रातील जळगावमधीवल एक सरकारी कर्मचारी आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय व्यक्तीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 2014-15 साली ही घटना घडली होती. त्यावेळी आरोपीचं वय साधारण 18 वर्ष होतं. तर पीडित मुलगी नववीत शिकत होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपीचा जामीन नाकारला होता. ज्याविरोधात आरोपीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याच प्रकरणी काल सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

सुनावणी दरम्यान कोर्टात काय घडलं?

सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश बोबडे यांनी आरोपीच्या वकिलाला विचारलं की, 'आरोपी पीडित मुलीशी लग्न करु शकेल का?

यावर वकिलाने कोर्टाला सांगितलं की, 'याबाबत मला माझ्या अशीलाला विचारावं लागेल.'

यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की, 'अल्पवयीन मुलीला फसवून तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी हा विचार तुम्ही करायला हवा होता. आम्हाला माहित आहे की, तुम्ही एक सरकारी नोकर आहात. आम्ही तुम्हाला लग्नासाठी जबरदस्ती नाही करीत आहोत. पण आम्हाला याबाबत सांगा की, आपण असं करु शकता का? अन्यथा आपण म्हणाल की, आम्ही पीडितेशी लग्न करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणत आहोत.'

जेव्हा ब्रेकनंतर सुनावणी पुन्हा सुरु झाली तेव्हा याचिकर्त्याच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, 'मला तिच्या तिच्याशी लग्न करायचे होते. पण तिने त्याला नकार दिला होता. पण आता मी तिच्यासोबत लग्न करु शकत नाही कारण आता माझं लग्न झालेलं आहे.'

ही बातमी पाहिली का?: बलात्काराचा आरोपी टॅटूमुळे का सुटला ?

नेमकं प्रकरण काय?

आरोपी हा 16 वर्षीय पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक आहे. एके दिवशी पीडित मुलीचं कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याची संधी साधत आरोपी त्यांच्या घरी गेला आणि तेव्हा मुलीला मारहाण करत तिचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला होता. एवढंच नव्हे तर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिच्यावर अॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या घटनेनंतर आरोपी अनेक महिने मुलीवर बलात्कार करत राहिला. दरम्यान, जेव्हा या सगळ्या प्रकाराला कंटाळून मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याच्या (POSCO) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण स्वतंत्र खंडपीठाकडे सोपवलं असून आरोपीच्या अटकेला 4 आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ४ आठवड्यानंतर या प्रकरणात नेमकं काय घडणार हे समजणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in