"ओबीसी म्हणून पंकजांना पाडलं, जानकरांना हरवलं आणि प्रीतम मुंडेंना मंत्रीपद नाकारलं"

केंद्र सरकारकडून ओबीसींना डावलण्याचं षडयंत्र; यशोमती ठाकूर यांचा आरोप
"ओबीसी म्हणून पंकजांना पाडलं, जानकरांना हरवलं आणि प्रीतम मुंडेंना मंत्रीपद नाकारलं"

-जका खान, बुलढाणा

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजपतील ओबीसी समाजातील काही जणांची नावं घेत काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून ओबीसी समुदायाला डावलण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला.

ओबीसी महासंघाच्या वतीने शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, "आपल्या देशात काहीतरी चुकतंय. ओबीसी समाजाला सतत डावलण्याचं काम केंद्रात सत्तेत बसलेले लोक करीत आहेत. ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन, नको त्या गोष्टी करून घेण्याची केंद्रात सत्तेत बसलेल्यांना सवय लागली आहे, ही वस्तुस्थिती आहे."

"आपल्या समाजाची बहीण पंकजा मुंडे यांनाही या लोकांनी पाडलं. त्यांची बहिण प्रीतम मुंडे यांना ओबीसी आहे म्हणून केंद्रात मंत्रीपद नाकरलं. आज महादेव जानकरांचीही तीच अवस्था केलीये. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून ओबीसींना डावलण्याचं षडयंत्र आहे,"असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

"विरोधी पक्ष नेत्यांचा असा काही आरडाओरडा असतो की, आवाज फक्त त्यांच्याकडेच आहे. पण जेव्हा आम्ही ओरडू तेव्हा, मात्र तुम्हाला आवाज काय असतो हे कळेल. वेळ आल्यावर आम्ही ते ही करू", अशी टीका यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

"आपल्या समाजाची बहीण पंकजा मुंडे यांना या लोकांनी पाडलं. आज त्या चुकीच्या पक्षात आहेत. पुण्यात हत्यारांसह एक तरुण सापडला होता. चौकशीत मात्र तो ओबीसी समाजाचा असल्याचे समजले. मात्र केंद्रात सत्तेत बसलेल्यांसाठी काम करीत होता. अशाप्रकारे आपल्या मुलांचा, तरुणांचा वापर ही मंडळी करीत आहेत", असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in