ऊसाचं क्षेत्र मोठं असल्यानं या परिसरात बिबट्यांचा वावर अधिक असतो. त्यामुळे ऊसतोडीच्या काळात बिबट्याची पिल्लं सापडण्याच्या घटना घडतात.
जुन्नर तालुक्यातील आळे आगरमळा लगतच्या बोरी शिवारात सुनिल कुऱ्हाडे यांच्या शेतातील उस तोडणी सुरू असताना अशीच बिबट्याची २ पिल्लं आढळून आली.
ऊस तोडणी थांबवून लागलीच वन अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. पिल्लांना त्यांची आई घेऊन जाईल यासाठी त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं होतं.
शनिवारी (९ एप्रिल) सकाळपर्यंत परत हे बछडे तिथेच असल्याचं दिसून आलं.
सकाळी ऊस तोडणीला आलेल्या मजुरांना ऊसातून बिबट्याच्या मादीचा आवाज येऊ लागल्याने ऊसतोड थांबवण्यात आली.
त्यानंतर वन अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यात आलं. सध्या ही पिल्लं आईच्या सहवासात सोडण्यासाठी वन अधिकाऱ्यांकडून पुन्हा प्रयत्न केले जात आहेत.