शरद पोंक्षेंचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, "वीर सावरकर राहिले त्या तुरुंगात एक दिवस राहून दाखवा"

जाणून घ्या शरद पोंक्षे यांनी नेमकं काय म्हटलं आहे राहुल गांधींना उद्देशून?
Actor Sharad Ponkshe Posts a Video on Veer Savarkar and Challenges Congress Leader Rahul Gandhi
Actor Sharad Ponkshe Posts a Video on Veer Savarkar and Challenges Congress Leader Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तसंच त्यांची भारत जोडो यात्रा थांबवण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र अभिनेते शरद पोंक्षे यांनी थेट राहुल गांधी यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. शरद पोंक्षे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांचं नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांना थेट ओपन चॅलेंजच दिलं आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओची चांगलीच चर्चा आहे.

काय म्हणतात शरद पोंक्षे आपल्या व्हीडिओत?

ए मूर्खा, कुठे फिरतोय? त्यापेक्षा इकडे ये एकदा.. हे बघ ही ती खोली ज्या खोलीत वीर सावरकरांना ठेवलं होतं. या ७ बाय ११ च्या या खोलीत सावरकर राहायचे. कैद्याचे कपडे, हातात आणि गळ्यात साखळदंड अशा आवस्थेत ११ वर्षे सावरकर राहिले. एवढी बडबड करण्यापेक्षा, बरळण्यापेक्षा इथे ये. ११ वर्षे सोड, ११ दिवसही सोड, फक्त एक दिवस या खोलीत राहून दाखव. तुझ्या गळ्यात, हातात साखळदंड अडकवतो. अर्ध कच्चं मांस, घाणेरडा भात, महारोग्यांच्या हातचं अन्न. त्यातले किडे काढून तेच अन्न सावरकर खायचे तसं खा. त्यानंतर थोडा वेळ काथ्या कुटायला घेऊन जातो. हे सगळं करुन दाखव मग बडबड कर. असं ओपन चॅलेंज शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना दिलं आहे.

वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in