
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात भाषण करत असताना माजी खासदार संभाजीराजे यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजेंनी अपक्ष लढावं हे देवेंद्र फडणवीस यांनीच सुचवलं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेने फडणवीसांवर चांगलीच टीका केली होती. तसंच संभाजीराजेंना ट्विट करून हे सांगावं लागलं होतं की मी जे बोललो ते सगळं खरं होतं. आज रायगडावर त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
काय म्हणाले आहेत संभाजीराजे?
मोगलशाही, आदिलशाही या सगळ्य गोष्टी असताना आदिलशाहाला लक्षात आलं की छत्रपती शिवराय म्हणजे वेगळंच काहीतरी रसायन आहेत. शिवाजी महाराज काहीतरी वेगळं रूप आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आवर कसा घालायचा? मग आदिलशाहाने ठरवलं बाप-लेकाचं भांडण लावायचं. शहाजीराजे आणि शिवाजीराजांमध्येच भांडण लावू असं आदिलशाहाने ठरवलं.
भांडण लावत असताना शहाजीराजेंवर इतका दबाव टाकला गेला होती की शिवाजीराजेही म्हणतील माझ्या वडिलांवर किती दबाव असेल. स्वराज्य स्थापन करणाऱ्या घराण्यातही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी आदिलशाहाने शहाजीराजेंना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं होतं की लेकास ताकीद देणे, नाहीतर पातशहाचा हवाला होतील असं लिहून देणे.. म्हणजे काय? तर तुमच्या मुलाला घरातच थांबवा नाहीतर आमच्यात सामील करून घ्या. यानंतर शहाजीराजेंनी उत्तर दिलं.
शिवाजी माझा लेक, मात्र आपल्या तो हुकूमात नाही. आपण पातशाह, त्यावर हल्ला करावा किंवा मानेल ते करावे आपण मधे येत नाही. याचा अर्थ काय? शहाजीराजे म्हणतात हा माझं लेकरू आहे ते माझं ऐकत नाही, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे तुम्हाला काय करायचं ते करा. असं म्हणत संभाजीराजेंनी शिवसेनेलाच हा टोला लगावला आहे.
आणखी काय म्हणाले संभाजीराजे?
आता शहाजीराजेंनी जे पत्र लिहिलं त्याप्रमाणे खऱंच शिवाजीराजे हे शहाजीराजांचं ऐकत नसतील हे आपण मान्य करायचं का? शहाजीराजे काही त्यांच्याशी काही बोलत नसतील का? मग शहाजीराजे असं का म्हणाले? ते मी सांगणार नाही ते तुम्ही शोधून काढा. यातून काय साधलं शहाजीराजेंनी? तर शिवाजीराजेंना स्वराज्य स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.
शिवाजी महाराजांनी समजून घेतलं की माझ्या वडिलांची इच्छा काय आहे. शिवाजी महाराजांनी जावळीचं खोरं ताब्यात घेतली, किल्ले ताब्यात घेतले. पुनर्बांधणी सुरू केली. शहाजीराजेंनी जे वाक्य लिहून दिलं होतं त्यावरच स्वराज्याचा पाया उभा राहिला. मी तुम्हाला हे परत परत का सांगतो आहे? तर इतिहासातून आपण बोध घेतला पाहिजे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजीराजांनी मोठा संघर्ष केला. मात्र संघर्ष करत असताना कुठेही स्वाभिमानाची तडजोड केली नाही.
माझ्यात स्वाभिमान आहे, आपण तडजोड करू पण स्वाभिमानाला तडा न देता. शिवाजी महाराज आणि संभाजीराजांनीही पुढे हीच शिकवण दिली की स्वाभिमान सोडायचा नाही. याच शिकवणुकीवर मी मार्ग क्रमण करतो आहे असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
शिवाजी महाराज यांना तहही करावे लागले होते. पुरंदरचा तह सर्वात वाईट होता. दोन पावलं शिवाजी महाराजांना मागे जावं लागलं. हा कोण औरंगजेब? आला कुठनं बाहेरनं याचा काय अधिकार आमच्या महाराजांचा अपमान करायचा? त्याच्या थडग्यावरून पण ज्या काही गोष्टी चाललं आहे त्याबद्दल मला काही बोलायचंही नाही.