
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राज्याचे पर्यावरण मंत्री आणि पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हिंदूंना अस्सल हिंदूत्वाचं स्वागत करायचं आहे, असं म्हणत राऊतांनी यावेळी राज ठाकरेंना (Raj Thackeray) डिवचलं.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "रामाच्या अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. जोरात स्वागत केलं जाणार आहे. अयोध्येत कोण जातं. कोण येतं याने फार फरक पडत नाही. प्रभू श्रीराम सर्वांचे भगवान आहेत.'
'कुणी खोट्या भावनेनं, राजकीय भावनेनं किंवा कुणाला कमी लेखण्यासाठी जात असेल, तर प्रभू रामांचा आशीर्वाद नाही. मिळत. उद्धव ठाकरेंसह आम्ही सर्वजण आंदोलनात होतो. उद्धव ठाकरेंही अयोध्येत गेले होते. आदित्य ठाकरेही जात आहेत,' असं राऊत यांनी सांगितलं.
'आदित्य ठाकरे अयोध्येला १० जून रोजी जाणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातूनच नाही, तर संपूर्ण देशातून शिवसैनिक, युवा सैनिक... शिवसेनेशी जोडले गेलेले उत्तर प्रदेशातील लोक अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन १० जून रोजी दर्शन घेणार आहेत,' अशी माहिती फडणवीसांनी दिली.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, 'कोण विरोध करतोय, का विरोध करतोय. या वादात मी पडू इच्छित नाही. मी माझी भूमिका मांडतोय. हा राजकीय दौरा नाही. श्रद्धेपोटी अयोध्येत जाणार आहोत.'
'उत्तर प्रदेशात बॅनर कुणी लावले माहिती नाही. उत्तर प्रदेशातील जनता सुजाण आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. राजकारण त्यांना चांगलं कळतं. एखाद्या दौऱ्यात राजकारण असेल, तर ते जनतेला कळतं. प्रभू श्रीरामांचीही अशा वेळी इच्छा नसते. असली-नकली ते बघतील,' असं राऊत यावेळी म्हणाले.
'तक्रारीमध्ये काही ताकद असेल. आम्ही काही चुकीचं केलं असेल, तर या देशातील प्रत्येक नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. ठाकरे कधीही दबावाखाली काम करत नाही. ठाकरेंचा दबाव असतो, हा इतिहास आहे,' असं उत्तर राणा दाम्पत्यांना दिला.
राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यानंतर ५ दिवसांनंतर आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. दरम्यान, सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अयोध्या दौऱ्यावर आहेत.