Ajit Pawar: 'दुसऱ्याच्या दारात कशाला जाता?..', अजित पवार राणा दाम्पत्यावर भडकले!

Ajit Pawar on Navneet Rana Hanuman Chalisa: हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार हे राणा दाम्पत्यावर चांगलेच भडकले आहेत. पाहा नेमकं काय म्हणाले अजित पवार.
Ajit Pawar: 'दुसऱ्याच्या दारात कशाला जाता?..', अजित पवार राणा दाम्पत्यावर भडकले!
ajit pawar gets angry with navneet ravi rana over hanuman chalisa issue

औरंगाबाद: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांना खडे बोल सुनावले आहेत. सध्या काही जण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत अजित पवारांनी हनुमान चालीसा आपल्या घरातच वाचण्याचा सल्लाही दिला आहे.

पाहा औरंगाबादमधील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री:

'दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालीसा म्हणायचं काय कारण?'

'काही जणं कारण नसताना देखील नवीन वाद निर्माण करतात. आपल्याला एकोप्याने पुढे जायचं असेल तर जातीय सलोखा हा तुम्हाआम्हाला ठेवावाच लागेल. काही जण त्यात मुद्दाम खो घालतात. मी आमदार आहे. माझी बहीण सुप्रिया ही खासदार आहे. आम्हाला जर हनुमान चालीसा म्हणायचा असेल तर आम्ही आमच्या घरात म्हणू ना.. दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणायचं काय कारण आहे.', असं म्हणत अजित पवार यांनी राणा दाम्पत्याला खडे बोल सुनावले आहेत.

'मंदिरं आहेत आम्ही तिथे जाऊन बसा'

'आम्हाला आमचं घर दिलंय ना.. आमच्या इथं मंदिरं आहेत आम्ही तिथे जाऊ बसू. परंतु मी तिथेच जाणार.. अरे काय तिथेच जाणार.. कशाकरता हा हट्ट.. बरं पोलीस सांगतायेत बाबांनो नका जाऊ त्यातून वातावरण खराब होईल. कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम त्यांचं आहे. आमचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं आहे.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

'इतके दिवस भोंगा आठवला नाही. आत्ताच भोंगा आठवला..'

'एक तर दोन वर्ष वाया गेली आपली कोरोनामध्ये. कित्येक लोकांचे धंदे बसले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांची दुकानदारी कमी झाली. कर्ज झाले. यातून आता पुन्हा एकदा ते संसार उभे करण्याचं काम करायचं आहे. अशावेळेस यांना सुचायला लागलं.'

'यांना इतके दिवस भोंगा आठवला नाही. आत्ताच भोंगा आठवला.. इतके वर्ष काय झालं होतं यांना?' अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली.

'लाऊड स्पीकरबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश स्पष्ट आहेत'

'बरं सुप्रीम कोर्टाने याबाबत काही नियमावली दिली आहे ना. वर्षातील 15 दिवस लाऊड स्पीकर उशिरापर्यंत कधी चालवायचं त्याचे देखील आदेश दिले आहेत. इतर वेळेस कधी चालवायचे त्याबाबतही स्पष्टपणे दिलेलं आहे.'

'सगळेजण मिळून-मिसळून एकमेकांच्या सणामध्ये, उत्सवामध्ये आपण सामील होऊ ना. तीच आपल्याला शाहू-फुले-आंबेडकरांनी शिकवण दिली आहे. या गोष्टीचाही विचार केला पाहिजे.' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

ajit pawar gets angry with navneet ravi rana over hanuman chalisa issue
दादागिरी करुन घरी येणार असाल तर...उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणा दाम्पत्याला सुनावलं

'काही जण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत'

'मला माहिती आहे की, हे व्यासपीठ वेगळं आहे. इथे हे बोलणं योग्य नाही. पण उद्याची भावी पिढी घडवण्याचं काम शिक्षक लोकं तुम्ही करता. तुमच्या हातामध्ये खूप काही आहे. ज्ञान देण्याचं, ज्ञान वाढवण्याचं.. त्यात कर्तबगार पिढी निर्माण करण्याचं, त्यांचा पाया मजबूत करण्याचं काम करता.'

'हे सगळं करण्याकरिता तुम्ही देखील समाधानी असलं पाहिजे. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन की, सध्या जे काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही जणं करतात.' असा गंभीर आरोप देखील अजित पवारांनी यावेळी केला आहे.

Related Stories

No stories found.