कोश्यारींबद्दल अजित पवार थेट बोलले, 'राज्यपालांना थांबायचं नसेल...'

हिवाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याचा मुद्दा येणार ऐरणीवर
ajit pawar says remove bhagat singh koshyari from governor post and appoint new person
ajit pawar says remove bhagat singh koshyari from governor post and appoint new person

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची चिन्ह आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबद्दल स्पष्टपणे या विषयावर भाष्य केलं असून, भाजपला कोंडीत पकडलंय.

अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केलीये. अजित पवार म्हणाले, 'आम्ही राज्यपालांविरोधात हल्लाबोल महामोर्चा काढला होता. राज्यपालांना पदावरून हटवा आणि तिथे दुसऱ्या कुणाला बसवा अशी आमची मागणी आहे.'

'राज्यपालपदी कोणत्या व्यक्तीला बसवावं हा केंद्राचा अधिकार आहे. एक-दोन वेळा चूक समजू शकतो. हे सातत्याने होत आहे. चुकून काही घडत नाही. अनेकजण हसत हसत विधाने करत आहेत,' असं म्हणत अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केलं.

'रामदास स्वामींचं उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला जातो, ते पटणारं नाही. महाराष्ट्र कधीही हे सहन करणार नाही. राज्यकर्ते कुणीही असले, तरी सत्तेवर येण्यासाठी शिवाजी महाराजांचंच नाव घेतात. महाराजांचा चेहरा दाखवूनच आम्ही त्या मार्गाने जाणार असल्याचं सांगतात,' असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

'केंद्र आणि राज्यात त्यांचं (भाजप) सरकार आहे. महाराष्ट्रात असं वारंवार घडत आहे, हे त्यांना वरिष्ठांना सांगायला काय होतं? राज्यपालांना थांबायचं नसेल तर त्यांना मुक्त करावं आणि दुसऱ्या कुणाची नेमणूक करावी', असा सल्ला देताना अजित पवारांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली.

'नाकाखालून सरकार खेचून नेलं', अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलं

'सरकार पाडण्यात आमचा काहीही संबंध नाही. आम्ही नामानिराळे आहोत, असं भाजपकडून सुरुवातीला सांगितलं गेलं. आता भाजपमधील काही लोकांची वक्तव्ये आली. मीच आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केले होते, असं काही जण म्हणाले', असं सागत अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना सुनावलं.

वेशांतर करून भेटण्यावरून उडवली खिल्ली

देवेंद्र फडणवीस वेशांतर करून एकनाथ शिंदेंची भेट घ्यायचे असं विधान अमृता फडणवीस यांनी सत्तांतरानंतर केलं होतं. त्यावरूनच अजित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला. 'काहींच्या कुटुंबातील लोकांनी ते वेषभूषा करून कसे जायचे हे सांगितलं. फोन करून मी पाठवलं. वेशभूषा बदलून जात होते. बदला घेतला हे कोण म्हटलं? हे सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ सुरुवातीपासूनच ते सरकार पाडण्याच्या तयारीत होते. हे त्रिवार सत्य आहे,' अशा शब्दात अजित पवारांनी फडणवीसांच्या 'नाकाखालून सरकार खेचून नेलं'च्या वक्तव्याला उत्तर दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in