
इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
आज मी कुणालाही उत्तर द्यायला आलेलो नाही. त्यांना मी उत्तर देऊ एवढी त्यांची लायकीच नाही. त्यांच्याकडे आहेच काय? माझ्या पक्षाचा एक खासदार आहे. त्यांचं दुकान बंद झालं आहे. जो भी कुत्ता भोकताँ है तो भोकने दो.. असं म्हणत राज ठाकरेंचं नाव न घेता अकबरुद्दीन ओवेसींनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये एका शाळेचा शीलान्यास अकबरूद्दीन ओवेसींच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले आहेत अकबरूद्दीन ओवेसी?
"मुस्लिम समाजाने मुळीच कुणालाही घाबरू नये. कुणीही काहीही बोलूदे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी आज कुणालाही उत्तर द्यायला, कुणालाही काही वाईट बोलायला आलेलो नाही. त्याची गरज नाही. त्यांची लायकीच नाही की मी त्यांना उत्तर द्यायचं. माझ्याकडे एक खासदार आहे. तू तर बेघर आहेस तुला काय उत्तर देऊ? तुला काही महत्त्वच नाही तुला काय उत्तर देऊ? तुला घरातून हाकलून दिलं होतं तुला काय उत्तर देऊ? अकबरूद्दीन ओवेसी लढणार. पण माझ्या ठरलेल्या वेळेला. तुझ्या ठरलेल्या वेळेला नाही."
"इथे आलेलं कुणी घाबरलंय का? कुणीही घाबरू नका. आज या देशात द्वेष पसरवला जातो आहे, मात्र अकबरूद्दीन ओवेसी द्वेषाचं उत्तर प्रेमाने देईल. लिंचिंग, अझान, हिजाब हे सगळे मुद्दे काढले जात आहेत. मात्र घाबरू नका, कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. बगदादमध्ये मुस्लिम समाजाची एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल झाली की मुस्लिम बांधवांच्या कापलेल्या शिरांची उंची कुतुबमिनारपर्यंत गेली होती. बगदादमध्ये प्रेतं सडत होती तेव्हा मराकसमध्ये दुर्गंधी येत होती. तरीही इस्लाम धर्म संपला नाही."
"आज कुणी हे समजत असेल की तू आम्हाला घाबरवशील आणि आम्ही घाबरून जाऊ तर तसं होणार नाही. हे तर औरंगाबाद आहे. ही अल्लाहची भूमी आहे. तुम्ही कुणी घाबरणार का? असं विचारलं तेव्हा गर्दीनेही एक सूरात नाही म्हटलं. "
राज ठाकरेंचं नाव न घेता टीका
"कुणीही घाबरू नका, लक्षात घ्या कुणी बोलत असेल.. मी तर पुढे जाऊन म्हणेन एखादा कुत्रा भुंकत असेल तर खुशाल भुंकू द्या.. तुम्ही वाघासारखे पुढे निघून जा. खास करून मी तरूणांनाही सांगू इच्छितो, जो कोणी जे काही बोलतो आहे बोलू द्या. जो कुत्रा जसा भुंकतो आहे भुंकू द्या.. कोणत्याही ब्रिडचा कुत्रा असू दे. कुत्र्यांचं काम भुंकणंच असतं, वाघ शांतपणे निघून जात असतो. त्यांच्या जाळ्यात फसू नका. ते आपल्याला अडकवण्यासाठी जाळं विणत आहेत. जे काही बोलत आहेत बोलू द्या तुम्ही हसत पुढे जा" असं म्हणत राज ठाकरेंचं नाव न घेता अकबरूद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.