दापोलीत वातावरण तापलं, ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा

शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दापोलीत वातावरण तापलं, ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा

रत्नागिरी- एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये वातावरण तापलेलं आहे. आज दापोलीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. ठाकरे गटाकडून रामदास कदम यांचा निषेध सुरु होता. त्याचवेळी शिंदे समर्थक त्या ठिकाणी आले आणि दोन्ही गटात राडा झाला. शाखा ताब्यात घेण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात आला.

दापोलीच्या सभेत काय म्हणाले होते रामदास कदम?

आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 'मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कुणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?', रामदास कदम उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले.

उद्धव ठाकरेंबरोबरच रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंवरही उपहासात्मक टीका केली. कदम म्हणाले, 'आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा आल्या नाही? याचं आश्चर्य वाटतंय. कुठेही गेले की त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाही. व्यासपीठावर चढल्या नाही', असं रामदास कदम रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले.

सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्येही झाला होता राडा

प्रभादेवी येथे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. यामध्ये सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप देखील सावंत यांनी केली होता. कथित गोळीबार प्रकरणाबाबत स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी पुढील तपासासाठी त्यांची रिव्हॉल्वर पोलिसांच्या ताब्यात दिली होती. मात्र गोळीबाराचा आरोप म्हणजे शिंदे सरकार विरोधातील कट कारस्थान असल्याचं सरवणकर यांनी स्पष्ट केलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in