
मुंबई: एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर विविध व्हिडिओ समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. या व्हिडिओमध्ये आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुम्ही आमचे गटनेते आहात. आमचे सर्व निर्णय आता तुम्ही घेणार आहात. यावर सर्व आमदारांनी अनुमोदन दिले आणि एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारले देखील आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
''आपले सुखं आणि दुख: एकच आहेत, आपण सर्व मिळून जे होईल त्याला सामोरे जाऊ, विजय आपलाच आहे. आपल्याला देशातील महाशक्तीची साथ आहे आणि त्यांनी मला सांगितलेले आहे की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो ऐतिहासीक निर्णय आहे, तुमच्या मागे आमची सर्व शक्ती आहे. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची प्रचिती येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.'' असे एकनाथ शिंदे त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. आता एकनाथ शिंदेंनी कोणत्या पक्षाचे नाव घेतले नाही परंतु भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.
एकनाथ शिंदेंनी ४६ आमदार आपल्सासोबत असल्याचा दावा केला होता. तसं शक्ती प्रदर्शन देखील त्यांनी केले. एकनाथ शिंदेंच्या गटातून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि कळंबचे आमदार कैलास पाटील परत महाराष्ट्रात आले आहेत. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के शिवसेनेलाच एकनाथ शिंदेंनी सुरुंग लावला आहे. परत आलेल्या शिवसेना आमदारांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.