'हे' गणित जुळलं तर काँग्रेसच्या भाईंची आमदारकी मुख्यमंत्र्यांच्या हातात!
Vidhan Parishad ElectionMumbai Tak

'हे' गणित जुळलं तर काँग्रेसच्या भाईंची आमदारकी मुख्यमंत्र्यांच्या हातात!

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार सध्या रिंगणात आहेत.

मुंबई: विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात दहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. भाईंना विधान परिषदेवर (Vidhan Parishad Election) जाण्यासाठी १० मतांची गरज आहे तर प्रसाद लाड यांना २२ मतांची गरज आहे. भाजपने आपले पाच तर महाविकास आघाडीने आपले ६ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. सदाभाऊ खोत यांनी या अगोदरच माघार घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली शिल्लक मतं कोणालाच देणार नसल्याचे जाहीर केले होते.

भाईंना ठाकरेंच्या आदेशाची खरी गरज

शिवसेनेचे सध्या ५५ आमदार आहेत. २६ च्या कोट्यानुसार शिवसेनेच्या दोन आमदारांना ५२ मतांची गरज आहे. दोन उमेदवारांना पुरेसं मतदान झाल्यानंतर शिवसेनेकडे ३ आमदारांचे संख्याबळ शिल्लक राहते. त्याचबरोबर शिवसेनेकडे ६ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. शिवसेने जर भाईंना शब्द दिला तर भाईंचा विजयी सोपा होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. भाई जगताप यांनी दोन दिवसांपुर्वी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचीही भेट घेतली होती.

प्रसाद लाड यांना विजय सोपा नाही

प्रसाद लाड हे भाजपचे पाचवे उमेदवार आहेत. त्यांना विजयी होण्यासाठी २२ मतांची गरज आहे. लाड हे आपल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आमदरांच्या भेटी घेत आहेत. हितेंद्र ठाकूर यांचीही भेट लाड यांनी घेतली होती, त्याचबरोबर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन हे ठाकूरांच्या भेटील गेले होते. राज्यसभा निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला मतदान केल्याचे सांगितले होते, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही ठाकूरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्याच्या परिस्थीमध्ये भाजपला २२ मतं जुळवणं सोपं नाहीये, परंतु राज्यसभेसारखी काही करामत केली तर लाडांचा विजय दूर नाही.

MIM, मनसे कोणाला करणार मतदान?

राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या एका मतालाही किंमत आहे. त्यामुळे पक्ष आपला उमेदवार निवडूण आणण्यासाठी एका मताची जुळवाजुळव करत आहेत. यामध्ये एमआयएमच्या दोन आमदारांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय एमआयएमने घेतला तर त्याचा फायदा भाईंना होऊ शकतो. त्याचबरोबर मनसेचा एक आमदार आहे. प्रसाद लाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. परंतु राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

विधान परिषदेला उभे असलेले उमेदवार

भाजप

उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड

शिवसेना

आमश्या पाडवी, सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in