BEST Electric Bus खरेदीत BMC कडून घोटाळा, भाजपकडून आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न

भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप, CVC ला पत्र लिहून केली तक्रार
BEST Electric Bus खरेदीत BMC कडून घोटाळा, भाजपकडून आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न
प्रातिनिधीक छायाचित्र

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. बेस्ट इलेक्ट्रिक बसच्या खरेदी प्रक्रीयेत घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपने Chief Vigilance Commissioner (CVC) ला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

इलेक्ट्रिक बसच्या खरेदी प्रक्रीयेत निवीदांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत हा प्रकार राज्यातील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

नेमका भ्रष्टाचार कुठे झाला? काय आहे भाजपचं म्हणणं?

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल 2022 ही इलेक्ट्रिक बससाठी आपली निवीदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. परंतू या तारखेच्या आधी काही दिवस बोलीदारांसाठी पात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली परंतू असं करत असताना अंतिम तारीख वाढवून देण्यात आली नाही. परदेशी बोलीदारांसाठी निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. हे CVC च्या नियमांचं उल्लंघन असून हे कंत्राट रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.

अमित साटम यांनी लिहीलेल्या पत्रातला महत्वाचा भाग -

CVC च्या निकषानुसार, सर्व निविदाधारकांना आपली निवीदा भरण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी देणं आवश्यक होतं. हा बदल आधीपासून ठरवण्यात आलेल्या परदेशी कंपनीला मार्ग सोपा व्हावा म्हणून करण्यात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल केल्यानंतर मुदतीची तारीखही वाढवून देण्यात आली नाही. त्यामुळे आधीपासूनच निश्चीत करण्यात आलेल्या कंपनीला टेंडर देण्यासाठी ज्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार राज्यातील एका हाय प्रोफाईल मंत्र्यामुळे करण्यात आला असून या मंत्र्याने काही दिवसांपूर्वीच UK मधील इलेक्ट्रीक बस कंपनीशी MOU केला असल्याचं साटम यांनी म्हटलं आहे. ऐनवेळा नियमांमध्ये केलेला बदल या कंपनीला कंत्राट मिळावं आणि त्यांना निवीदा प्रक्रियेत कोणाचीही स्पर्धा राहू नये म्हणून झाल्याचं साटम यांनी म्हटलं आहे.

भाजप आमदार अमित साटम यांनी Chief Vigilance Commissioner ना यासंदर्भातलं पत्र लिहीलं आहे. मुंबई तक शी बोलताना अमित साटम यांनी मुंबई महापालिकेत आदित्य सेने द्वारे केला जाणारा हा आणखी एक भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचारामध्ये आदित्य सेना आणि प्रशासनाची मिलीभगत आहे. मला खात्री आहे की महाविकास आघाडी सरकार या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं स्वारस्य दाखवणार नाही. म्हणूनच मी यासाठी Chief Vigilance Commissioner ना पत्र लिहून तक्रार केली आहे, असं अमित साटम म्हणाले.

दुसरीकडे शिवसेनेने भाजपचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणुक सुरु राहिपर्यंत भाजपचे हे आरोप असेच सुरु राहतील, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. "सध्या भाजप फक्त राजकारण आणि आरोप लावण्याचं काम करत आहे. प्रत्येक दिवशी ते काहीतरी नवा आरोप करतात परंतू आतापर्यंत त्यांनी एकही आरोप सिद्ध केलेला नाही. मुंबई महापालिकेत लोकांना दाखवण्यासाठी भाजपकडे काहीही नसल्यामुळे त्यांच्याकडून सध्या हे आरोप केले जात असल्याचं", म्हात्रे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.